मालेगाव परिसराला हक्काचे पाणी मिळणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:56 PM2018-12-07T23:56:39+5:302018-12-07T23:58:34+5:30
या भागाला उर्ध्व पैनगंगा (इसापूर) धरणाचे हक्काचे पाणी मिळणे अपेक्षित असताना सिंचन विभाग मात्र पाणी देण्यास टाळाटाळ करीत आहे़
मालेगाव : यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या येलदरी व सिद्धेश्वर धरणात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने मालेगाव परिसरातील बारा हजार हेक्टर शेतीपिकांच्या लाभक्षेत्रावर मोठे संकट निर्माण झाले असून या भागाला उर्ध्व पैनगंगा (इसापूर) धरणाचे हक्काचे पाणी मिळणे अपेक्षित असताना सिंचन विभाग मात्र पाणी देण्यास टाळाटाळ करीत आहे़ सदरील पाणी न मिळाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत़
खा़ अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना २००९ साली इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून भाटेगाव शाखेतून दाभडी (जि़हिंगोली) वितरिकेतून पूर्णा प्रकल्पक्षेत्रात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली तर उर्ध्व पैनगंगा येथून पाणी सोडण्यासाठी २८ एप्रिल २००९ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली होती़
त्यामध्ये उर्ध्व पैनगंगा धरण ७५ ते १०० टक्के भरलेले असल्यास या भागाला २० दलघमी तर ५० टक्के उपलब्ध पाणीसाठा असेल तर १० दलघमी पाणी देण्यास मंजुरी मिळाली होती़ सद्य:स्थितीत उर्ध्व पैनगंगा (इसापूर) धरणात ६५ टक्के पाणी साठा उपलब्ध असून शासन निर्णयाप्रमाणे पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाºया मालेगाव परिसरातील ऊस, हळद, कापूस या पिकांना १० दलघमी पाणी देणे बंधनकारक आहे़ सद्य:स्थितीत पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाºया सिद्धेश्वर, येलदरी धरणात मृतसाठा असल्याने मालेगाव परिसरातील पिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे़ सद्य:स्थितीत मालेगाव परिसरातील ऊस, कापूस, हळद व रबी पिकांचे एकूण लाभक्षेत्र १२ हजार हेक्टरच्या वर आहे़ उर्ध्व पैनगंगेचे पाणी मालेगाव परिसरातील शेतीला देण्यासंदर्भात ३ नोव्हेंबर रोजी खा़ अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत सिंचन विभागाची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाºया सिंचन विभागातील अधिकाºयांना पाणी देण्याबाबत खा़ चव्हाण यांनी सूचना केल्या़ या बैठकीला भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, संचालक रंगराव कदम, काँग्रेस तालुकाध्यक्ष केशवराव इंगोले, माजी जि़ प़ अध्यक्ष माणिकराव इंगोले, बळवंत पाटील यांची उपस्थिती होती़
उर्ध्व पैनगंगेच्या भाटेगाव शाखा कालव्यातून दाभडी (जि़हिंगोली) नाल्याद्वारे पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाºया मालेगाव, बामणी, देळूब बु़, कामठा बु़, डौर, धामधरी, कोंढा, देळूब खु़, शेलगाव बु़, पिंपळगाव म़, उमरी, सावरगाव, देगाव कु़, सांगवी खु़, गणपूर, मेंढला खु़, शहापूर आदींना गावातील शेती लाभक्षेत्राला व पिण्याच्या पाण्यासाठी लाभ मिळतो़ हक्काचे पाणी न मिळाल्यास मालेगाव परिसरातील १२ हजार हेक्टर पिके वाया जाणार आहेत़
दाभडी नाल्याचा प्रश्न अधांतरी
उर्ध्व पैनगंगेचे पाणी पूर्णा प्रकल्प क्षेत्रास भाटेगाव कालव्यातून हिंगोली जिल्ह्यातील दाभडी नाल्यातून मिळते़ पाणीपातळी वेळी या भागातील शेतकरी संपादित जमिनीचा मावेजा न मिळाल्यामुळे पाणी देण्यास अनेक वर्षांपासून विरोध करतात़ दाभडी नाल्याच्या दुरुस्तीसाठी शासनाचा निधी उपलब्ध असूनही हे काम मात्र रेंगाळलेले आहे़
मालेगाव परिसरात एकूण बारा हजार हेक्टर लाभक्षेत्र असून सध्या ऊस, हळद यासारखी पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत़ उर्ध्व पैनगंगेचे पाणी १० दलघमी रोटेशन ४:३:३ असे विभागून देण्यात यावे -केशवराव इंगोले, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, अर्धापूऱ
इसापूरचे पाणी हे शेतकºयांच्या हक्काचे पाणी आहे़ पाणी उपलब्ध असूनही सिंचन विभाग मात्र पाणी देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे़ पाणी न मिळाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे -रंगराव इंगोले, संचालक, भाऊराव चव्हाण सक़ारखाना़