नादुरुस्त कॅनॉलमुळे चिंता वाढली, विष्णुपुरी आवर्तनाचा शेतकऱ्यांना होणार का फायदा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 05:40 PM2021-11-29T17:40:45+5:302021-11-29T17:42:40+5:30
मागील पंधरा - वीस वर्षांपासून या कॅनॉलचे काम अर्धवट स्वरूपाचेच असून मुख्य कॅनॉलला जोडणाऱ्या चाऱ्या तर अजूनही बेवारसच आहेत.
नांदेड : शंभर टक्के शेतजमीन पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने विष्णुपुरी प्रकल्पातून रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या प्रकल्पांतर्गत निर्माण करण्यात आलेले कॅनॉल व त्याला जोडण्यात आलेल्या चाऱ्या गवत, झुडुपांनी गच्च भरल्यामुळे सोडलेले पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचूच शकणार नाही. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पातून सोडणाऱ्या पाण्याचा आम्हाला काय फायदा? असा सूर कॅनाॅल परिसरातील शेतकऱ्यांतून निघत आहे.
नादेड जिल्ह्यातील नांदेड, लोहा, नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची बरीच शेती निसर्गावर अवलंबून आहे. नेहमीच नैसगिक आपत्तीच्या आहारी त्यांची पिके जाऊन मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना नियोजित व हक्काचे पाणी मिळावे ल शेतकरी सदन व्हावा, या उद्देशाने या तालुक्यातील परिसरामध्ये विष्णुपुरी प्रकल्पांतर्गत कॅनॉल निर्मिती करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांची लाखो एक्कर जमिनी गेल्या. त्याबदल्यात शेतकऱ्यांना मिळणारा मावेजाही तुटपुंज्या स्वरूपाचा होता. मात्र, शेतकरी पाण्यामुळे आपल्याला फायदा होईल, या आशेने हप्प राहिले. मागील पंधरा - वीस वर्षांपासून या कॅनॉलचे काम अर्धवट स्वरूपाचेच असून मुख्य कॅनॉलला जोडणाऱ्या चाऱ्या तर अजूनही बेवारसच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी तर मिळत नाहीच, उलट यामुळे कॅनॉल मध्ये व बाजूने गवत मादत आहे. त्यामुळे बाजूचे शेतकरी यावर गुरे चारण्यासाठी आणत आहेत व पिकांचेही नुकसान करीत आहेत. यातून अनेकदा भांडणाचे प्रकार घडत असून शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. या कॅनॉलची दुरुस्ती करून मगच पाणी सोडल्यास शेवटपर्यंच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल व पाणी वाया जाणार नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे.
रब्बी पिकांसाठी आवर्तने सोडण्याचे झाले नियोजन
माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नुकतेच रब्बी पिकांसाठी विष्णुपुरी प्रकल्पातून आवर्तने सोडण्याचे जाहीर केले आहे. या पाण्याचा नांदेड, लोहा, नायगाव तालुक्यातील बऱ्याच खेड्यांना फायदा होणार आहे. मात्र, या कॅनॉलमध्ये गवत, झुडुपे वाढल्यामुळे पाणी शेवटपर्यंत जाण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच लोहा व नायगाव तालुक्यातील भागामध्ये या कॅनॉलल्या जोडलेल्या चाऱ्यांचे कामच झाले नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही. कॅनॉलची साफसफाई करून चाऱ्यांचे बांधकाम करावे व नंतरच पाणी सोडावे, असा सूर या परिसरातील शेतकऱ्यांतून निघत आहे.
जमीन पडीक राहत आहे
माझ्या शेतातून कॅनाल जाणार म्हणून वीस वर्षांपूर्वी जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. यात माझी बरीच जमीन गेली. नंतर कॅनॉल खोदून सिमेंटचे आतून बांधकाम केले. मात्र, बाजूने जोडलेल्या चाऱ्यांचे कामच केले नाही. मागील दोन वर्षांपासून पाणी सोडत आहेत. मात्र, अर्धवट कामामुळे माझ्या शेतापर्यंत पाणीच पोहोचतच नाही. त्याचा परिसरातील शेतकऱ्यांनाही काही फायदा होत नसून हे पाणी मिळेल त्या मार्गाने नदीत जाऊन पडते. यामुळे जमीन पडिक राहात असून जनावरांचा त्रास मात्र वाढला आहे.
- शेख मुकद्दर, शेतकरी