वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:22 AM2019-03-27T00:22:56+5:302019-03-27T00:23:41+5:30
अर्धापूर तालुक्यातील पार्डी परिसरात सोमवारी रात्री अचानक विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने हाहाकार माजविला
पार्डी : अर्धापूर तालुक्यातील पार्डी परिसरात सोमवारी रात्री अचानक विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने हाहाकार माजविला असून घरांवरील पत्रे उडून परिसरातील केळी, गहू, हळद, ज्वारी, पपई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले़
पार्डी परिसरातील शेणी, कारवाडी, निमगाव, चिंचबन परिसरात सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटांसह वादळी वाºयासह अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे़ यावर्षी अगोदरच पाण्याच्या कमतरतेमुळे केळीची लागवड कमी झाली होती़ काही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केळीच्या बागा जोपासल्या होत्या; पण सोमवारी झालेल्या वादळी वा-यामुळे केळीच्या बागाचे मोठे नुकसान झाले़ यात शेतक-यांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे़ अचानक झालेल्या या अस्मानी संकटाने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे़ तसेच अचानक आलेल्या संकटाने शेतक-यांची एकच धावपळ होऊन मोठी तारांबळ उडाली़
सध्या पार्डी परिसरात मोठ्या प्रमाणावर परराज्यातील मजूरदार हळद कामानिमित्ताने पार्डी परिसरात आले असून त्याचा शेतातच मुक्काम असल्याने रात्री आलेल्या वादळी वा-याचा फटका बसला़ त्याच्या राहण्याचे पाल वादळी वा-यात उडून गेले होते़ त्यामुळे त्याची मोठी तारांबळ उडाली़ तसेच शेतात असलेल्या गायी, म्हशी, बैल आदी जनावरे किरकोळ जखमी झाले आहेत़ तसेच शेतातील आखाडे पूर्णत: उद्ध्वस्त झाले असून शेतातील मजुरांना याचा मोठा फटका बसला आहे़ अर्धापूर तालुक्यातील पार्डी परिसरातील चिंचबन परिसरात केळीच्या बागावर मोठा परिणाम झाला आहे़ मोठ्या प्रमाणावर गहू आडवा पडला असून ज्वारीच्या पिकाला वादळी वाºयाचा फटका बसला आहे़ आंब्याचे नुकसान झाले़ टरबुजाच्या मळ्याना वादळी वा-याचा फटका बसला़ नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गापासून तीन किमी अंतरावरील शेणी गावाच्या रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड पडल्याने हा मार्ग वाहतुकासाठी बंद झाला होता़
परराज्यातील मजूरदार हळदीच्या कामानिमित्ताने पार्डी परिसरात मोठ्या प्रमाणावर आलेले असून त्यांचा रानात मुक्काम असल्याने सोमवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावण्याने त्याची एकच तारांबळ उडाली होती़ पार्डी परिसरात मोठ्या प्रमाणात हळद काढणी व शिजवण्याचे काम सुरू असल्याने शेतकरी व मजूरदार रात्री शेतातच मुकामास असल्याने अचानक वादळी वा-यामुळे एकच धांदल उडाली़
१२ तास वीजपुरवठा खंडित
पार्डी परिसरात सोमवारी रात्री वादळी वा-यासह पावसाने झोडपून काढले़ या वादळी वा-यामुळे पार्डी उपविभागातील बहुतांश गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता़ यामुळे १२ तास वीजपुरवठा खंडित झाला होता़ कर्मचा-यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला़ मात्र अंधारामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यास अडथळा येत होता़ दोन विद्युत खांब मोडून खाली पडल्यामुळे ताराही जमिनीवर लोंबकळत होत्या़ त्यामुळे परिसरातील १२ तास वीजपुरवठा खंडित होता़