पोलीस दलात बदलीचे वारे; नांदेड ग्रामीणसाठी फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:39+5:302021-07-08T04:13:39+5:30
नांदेड : कोरोनामुळे रखडलेल्या पोलीस दलातील बदल्यांना आता सुरुवात झाली आहे. त्यातच मलाईदार ठाणे मिळविण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावण्यास ...
नांदेड : कोरोनामुळे रखडलेल्या पोलीस दलातील बदल्यांना आता सुरुवात झाली आहे. त्यातच मलाईदार ठाणे मिळविण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार असून, सत्तेत सहभागी नेते आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना चांगले ठाणे मिळावे म्हणून वजन वापरतात.
अधिकारीही मग त्यांच्या सोयीप्रमाणे सेवा देतात. काही ठिकाणी बदल्यांसाठी मोठ्या रकमाही मोजल्या जातात. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच ठेवली जाते. नांदेडात काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आता नव्याने पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. आवडते ठाणे मिळविण्यासाठी आतापासूनच जोर लावण्यात येत आहे. या बदल्यांची सध्या पाेलीस दलात चवीने चर्चा सुरू आहे.
नांदेड ग्रामीण : शहरात नांदेड ग्रामीण हे सर्वांत मलाईदार ठाणे समजले जाते. याच भागात सर्वाधिक अवैध धंदे आहेत. ठाण्याची हद्दही मोठी आहे. त्यामुळे अनेकांची पहिली पसंती नांदेड ग्रामीणला असते.
बिलोली : ग्रामीणमध्ये बिलोली पोलीस ठाण्याला अधिक पसंती दिली जाते. अवैध वाळूसह इतरही व्यवसायातून या ठिकाणी कमाई असते. त्यात सीमाभाग असल्याचाही फायदा आहे.
देगलूर : देगलूर ठाण्यालाही अधिकारी जाण्यास उत्सुक असतात. सीमाभाग आणि इतर अवैध धंदे या ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात आहेत. बाजारपेठही मोठी आहे. त्यामुळे या ठाण्यासाठी अधिक पसंती असते.
हिमायतनगर : हिमायतनगर तालुका तसा क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान आहे. त्यातच काही विशेष उलाढाल नसल्यामुळे हिमायतनगर ठाण्यात जाण्यास नासपंती दर्शविली जाते.
नायगाव : नायगाव पोलीस ठाण्याचीही तीच अवस्था आहे. कोणताही पोलीस अधिकारी नायगाव पोलीस ठाण्यासाठी फिल्डिंग लावत नसल्याचे दिसून येते.
माहूर : मुख्यालयापासून साधारणत: शंभर किलोमीटर अंतरावर असलेले माहूर पोलीस ठाणेही अनेक अधिकाऱ्यांना नकोसे वाटते. दुर्गम भागात असलेल्या ठाण्याला विदर्भाची सीमा जोडून आहे. त्यामुळे सहसा कुणीही माहूरसाठी आग्रह धरत नाही.