स्थायीच्या सभेत वादळी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:27 AM2019-01-31T00:27:58+5:302019-01-31T00:28:37+5:30
शहरातील रस्त्यांची अवस्था, पाणीप्रश्न, स्वच्छता तसेच १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या रक्कमेच्या विनियोगाच्या विषयावरुन स्थायी समितीची बुधवारी झालेली सभा वादळी ठरली. या सभेत शहरातील दोन प्रभागातील दलित वस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
नांदेड : शहरातील रस्त्यांची अवस्था, पाणीप्रश्न, स्वच्छता तसेच १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या रक्कमेच्या विनियोगाच्या विषयावरुन स्थायी समितीची बुधवारी झालेली सभा वादळी ठरली. या सभेत शहरातील दोन प्रभागातील दलित वस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीचे सभापती फारुख अली खान यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ११ प्रस्ताव ठेवण्यात आले होते. स्थायी समितीपुढे ठेवण्यात आलेल्या प्रस्तावाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे आदेश सभापती फारुख अली खान यांनी प्रारंभी दिले. सदस्यांनी प्रस्ताव ठेवायचे आणि त्यावर प्रशासनाने कोणतीही कार्यवाही करायची नाही, ही बाब निश्चितच यापुढे चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सभेत शहरातील रस्त्यांच्या अवस्थेवर वादळी चर्चा झाली. रस्ते दुरुस्त करण्याचे काम तत्काळ हाती घ्यावे, अशी मागणी सदस्यांनी केली. आर्थिक स्थितीमुळे ही कामे रखडल्याचा खुलासा प्रशासनाने केला. शहरातील स्वच्छतेच्या विषयावर चर्चा करताना शहरात किती वाहनांद्वारे कचरा उचलला जातो, किती मजूर आहेत, किती साहित्य आहे याची इत्यंभूत माहिती सर्व सदस्यांना देण्याची सूचना सभापतींनी केली. नगरसेवकांना प्रत्येकी दहा लाख रुपये स्वेच्छानिधी देण्याच्या विषयावरही चर्चा झाली. ज्या सदस्यांनी प्रस्ताव दिले आहेत त्यांची कामे मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीत शहरातील सिद्धांतनगर भागात दलित वस्ती निधीतून नाला व खडीकरण कामासाठीच्या ४८ लाख ७२ हजार रुपयांच्या निविदा प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली. तसेच प्रभाग ८ मध्ये आंबेडकरनगर भागातही ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर केले आहेत. ही निविदाही मंजूर करण्यात आली. या बैठकीस अ. रशीद अ. गणी, फारुख हुसेन बदवेल, राजेश यन्नम, मसूदखान, मोहिनी येवनकर, शमीम अब्दुल्ला, अ. लतीफ, ज्योती कल्याणकर यांच्यासह आयुक्त लहुराज माळी, नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांची उपस्थिती होती़
- याच सभेत मोहिनी येवनकर यांनी वित्त आयोगाचा महापालिकेला किती निधी प्राप्त झाला? हा निधी निकषानुसार खर्च झाला काय? शिल्लक निधी किती? आदी प्रश्न विचारले होते. या विषयावरील चर्चेत सदस्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. निकषाला डावलून चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च केल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व विषयाची संचिका सभागृहात सादर करावी, अशी मागणी येवनकर यांनी केली. ही संचिका आणत असल्याचे सांगून प्रशासनाने वेळ मारुन बैठक संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहिनी येवनकर यांनी संचिका आल्याशिवाय बैठक संपवू देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यावेळी आयुक्त माळी यांनी सभापतींशी चर्चा करुन आगामी बैठकीत सदर संचिका ठेवण्यात येईल, असे सांगितले.