‘स्थायी’त आज वादळी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:52 AM2019-01-30T00:52:34+5:302019-01-30T00:52:56+5:30
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे फारुख अली खान यांची निवड झाल्यानंतरच तब्बल महिनाभरानंतर पहिली बैठक बुधवारी होणार आहे. दोन दलितवस्ती कामांसह शहरातील स्वच्छता, स्वेच्छा निधी तसेच अमृत योजनेवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
नांदेड : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे फारुख अली खान यांची निवड झाल्यानंतरच तब्बल महिनाभरानंतर पहिली बैठक बुधवारी होणार आहे. दोन दलितवस्ती कामांसह शहरातील स्वच्छता, स्वेच्छा निधी तसेच अमृत योजनेवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे फारुख अली खान यांची १८ डिसेंबर २०१८ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली होती. या निवडीनंतर त्यांच्या कार्यकाळातील पहिली बैठक एक महिना ११ दिवसानंतर होत आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता स्थायी समिती सभागृहात होणाऱ्या या बैठकीत शहरातील सिद्धांतनगर आणि आंबेडकरनगर भागात होणाºया दलित वस्तीकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. सिद्धांतनगर भागात नाला व सीसी रस्त्यासाठी ४८ लाख ७२ हजार रुपये मंजूर झाले आहेत तर आंबेडकरनगर भागात ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाच्या निविदा प्रक्रियेला बुधवारच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे.
त्याचवेळी शहरात अमृत योजनेचे काम सुरु आहे. या योजनेतून आतापर्यंत कोणकोणती कामे करण्यात आली आहेत, कोणकोणती कामे शिल्लक आहेत, याची माहिती मागविण्यात आली आहे. तर सदरचे काम करणाºया ठेकेदाराविरुद्ध प्रशासनाकडून काय कारवाई केली आहे? याची विचारणाही स्थायी समितीने केली आहे. सदर ठेकेदार काम पूर्ण करत नसेल तर दुसºया ठेकेदारामार्फत हे काम पूर्ण करुन घ्यावे, असा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.
प्रभाग क्र. १२ मधील स्वच्छतेसंदर्भात अ. रशीद अ. गनी यांनी माहिती मागविली आहे. तसेच मोहिनी येवनकर यांनी महापालिकेला १४ व्या वित्त आयोगातून किती निधी प्राप्त झाला, वित्त आयोगाचे काय निकष होते, त्यापैकी किती खर्च झाला याची माहिती सभागृहासमोर ठेवावी, असे सूचित केले आहे. एकूणच या सर्व विषयांवर ही बैठक गाजणार आहे.