अनैतिक संबंधाच्या आरोपातून महिलेला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:10 AM2018-04-13T05:10:07+5:302018-04-13T05:10:07+5:30
अनैतिक संबंधाच्या आरोपातून एका महिलेला चौघींनी दोरीने बांधून व डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण केल्याची घटना ९ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील आसोली येथे घडली़ मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
नांदेड : अनैतिक संबंधाच्या आरोपातून एका महिलेला चौघींनी दोरीने बांधून व डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण केल्याची घटना ९ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील आसोली येथे घडली़ मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
मनीषा (नाव बदलले) पती व दोन मुलांसोबत आसोली येथे राहाते़ तीन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याच्या आरोपातून मार्च महिन्यात गावातील प्रतिष्ठित मंडळींनी तिला व तिच्या प्रियकराला बैठकीसाठी बोलविले होते़ या वेळी हे नाते पुढे न ठेवण्याचे सर्वांसमक्ष ठरविण्यात आले़ प्रियकराकडून तिला २ लाख रुपये देण्यात आले़ त्यानंतर ती माहेरी गेली.तरीही प्रियकर तिला वारंवार फोन करीत होता़
९ एप्रिलच्या दुपारी ती आसोली येथे प्रियकराच्या घरी गेली़ या वेळी प्रियकराची संतप्त पत्नी व अन्य तीन महिलांनी हात- पाय बांधून घरासमोरच तिला बेदम मारहाण केली. काही वेळाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून तिला वाई येथील रुग्णालयात दाखल केले़ याप्रकरणी ललिताबाई चव्हाण, सुमित्राबाई चव्हाण, रख्माबाई राठोड व शांतीबाई चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली़