मालेगाव येथे पाण्यासाठी महिलांनी सरपंचास ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 05:50 PM2018-06-21T17:50:46+5:302018-06-21T17:50:46+5:30
दिवसांपासून मालेगाव येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार लेखी, तोंडी मागणी करूनसुद्धा पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतने सोडविला नाही. यामुळे संतप्त महिलांनी आज सरपंचांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले.
मालेगाव (नांदेड) : मागील अनेक दिवसांपासून मालेगाव येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार लेखी, तोंडी मागणी करूनसुद्धा पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतने सोडविला नाही. यामुळे संतप्त महिलांनी आज सरपंचांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले.
मालेगाव येथील पाणी पुरवठा , स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मागील २० दिवसांपासून गावातील इंदिरा नगर, जंगमवाडी, शिक्षक कॉलनी परिसरात पाणी पुरवठा बंद आहे. या संदर्भात गावातील महिला ग्रामपंचायतला जाब विचारण्यासाठी गेल्या असता कार्यालयात ग्रामसेवक अथवा कोणताच लोकप्रतिनिधी हजर नव्हता. अखेर सर्व महिलांनी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाशिष कामेवार यांच्या नेतृत्वाखाली आपला मोर्चा सरपंच उज्वला इंगोले यांच्या घराकडे वळवला.
यानंतर महिलांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ठिय्य्या मांडला. काही वेळातच सरपंच इंगोले कार्यालयात आल्या असता महिलांनी घोषणाबाजी करीत त्यांना कार्यालयातच कोंडले. दरम्यान दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यालय उघडण्यात आले.