सासुरवास थांबेना; नांदेड जिल्ह्यात दररोज सरासरी दोन कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यांची होते नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 07:23 PM2020-02-12T19:23:24+5:302020-02-12T19:23:54+5:30

गरिबांपेक्षा श्रीमंत घरांतील सर्वाधिक प्रकरणे महिला साहाय्य कक्षाकडे येत असल्याची माहिती

women harassment does not stop; An average of two family harassment cases were reported daily in Nanded district | सासुरवास थांबेना; नांदेड जिल्ह्यात दररोज सरासरी दोन कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यांची होते नोंद

सासुरवास थांबेना; नांदेड जिल्ह्यात दररोज सरासरी दोन कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यांची होते नोंद

Next
ठळक मुद्देपती-पत्नीमध्ये   सुसंवाद आवश्यक

- शिवराज बिचेवार

नांदेड : महिलांच्या कौटुंबिक छळाबाबत विविध पातळ्यांवर प्रबोधन केले जाते़ मात्र, त्यानंतरही महिला  अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीत़ पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात प्रत्येक दिवशी सरासरी दोन गुन्हे महिलांच्या कौटुंबिक छळासंबंधी दाखल होतात़ मंगळवारी जिल्ह्यात अशाच प्रकारचे तीन गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले होते़ 

नायगाव तालुक्यातील पळसगाव येथे एक मुलगी दाखविली अन् लग्न दुसऱ्याच मुलीशी लावून दिल्याचा आरोप करीत विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे़ गेल्या दोन वर्षांपासून विवाहितेला त्रास देण्यात येत होता़ पीडित महिलेला दिसायला चांगली नाहीस असे टोमणे मारण्यात येत होते़ तुझ्या माहेरच्यांनी दुसरी मुलगी दाखवून तुझ्याशी लग्न लावून दिल्याचा आरोप करीत उपचारासाठी झालेला खर्च माहेराहून आणण्यासाठी विवाहितेला मारहाण करण्यात आली़ 
याप्रकरणी प्रकाश प्रभाकर कांबळे, राजेश प्रभाकर कांबळे, यमुनाबाई प्रभाकर कांबळे व प्रभाकर अमृता कांबळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दुसऱ्या एका घटनेत, कंधार तालुक्यातील मरशिवणी येथे पैशाच्या मागणीसाठी विवाहितेला त्रास दिला़ घर बांधकामासाठी माहेराहून २० लाख रुपये घेवून येण्याची मागणी करण्यात आली होती़ त्यासाठी प्रताप अशोक देवकते, अशोक देवकते, जनाबाई अशोक देवकते, पूजा सुग्रीव देवकते, सुनिता शिवराज दुंडे आणि सुग्रीव अशोक देवकते या सहा जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे़ 

तिसरा गुन्हा हिमायतनगर तालुक्यात दाखल झाला़ तालुक्यातील खडकी येथे हुंड्यातील राहिलेले दोन लाख रुपये घेवून येण्याच्या मागणीसाठी विवाहितेला मारहाण करीत तिच्या अंगावरील दागिने काढून घेण्यात आले़ या प्रकरणी शाम नारखेडे, नामदेव नारखेडे, विजय नारखेडे, सुरेश नारखेडे, सुदाम नारखेडे, कमलाबाई नारखेडे, कविता नारखेडे, सुषमा नारखेडे, गौरव नारखेडे, शिवराणी नारखेडे व सचिन डांगे यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे़ दरम्यान, विवाहितांच्या छळाचे गुन्हे वाढल्याचे चित्र आहे़

डॉक्टर पत्नीला दोन कोटींची मागणी
महिला साहाय्य कक्षाकडे काही दिवसांपूर्वीच एका पीडित महिला डॉक्टरचे प्रकरण आले़ या महिलेला लग्नानंतर पती अमेरिकेला घेवून गेला़ त्या ठिकाणी एक वर्ष ही महिला पतीसोबत होती़ परंतु अमेरिकेत महिलेच्या पतीचे अन्य महिलेसोबत संबंध असल्याचे तिच्या लक्षात आले़ त्यानंतर पतीने पत्नीला नांदेडला आणून सोडले़ मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी पीडित महिलेला दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली़ सासू-सासऱ्यांनीही दोन कोटी रुपये आणल्याशिवाय नांदवायला नेणार नाही, अशी भूमिका घेतली़ त्यामुळे पीडित महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षाकडे धाव घेतली़ तर दुसऱ्या एका प्रकरणात वैज्ञानिक पती असलेल्या पीडितेने महिला साहाय्य कक्षाकडे धाव घेतली होती़ या ठिकाणी दोघांचेही तब्बल सहा तास समुपदेशन करण्यात आले़ त्यानंतर त्यांनी एकत्र संसार करण्याचे हमीपत्र लिहून दिले़ गेल्या चार महिन्यांपासून ते दोघेही एकत्र आहेत़ 

पती-पत्नीमध्ये   सुसंवाद आवश्यक
सुखी संसारासाठी पती अन् पत्नीमध्ये सुसंवाद अत्यंत आवश्यक आहे़ परंतु, आजघडीला हा संवादच कुठे तरी हरवत चालला आहे़ दोघांनाही एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे़ एखादा विषय एकमेकांना आवडत नसला तरी, त्याबाबत उघड नाराजी व्यक्त केल्यामुळेही नात्यात दुरावा निर्माण होवू शकतो़ महिला साहाय्य कक्षाच्या माध्यमातून पतिपत्नी यांचे समुपदेशन करुन त्यांच्या मनात एकमेकांबद्दल नेमके काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो़ सामोपचाराने प्रश्न सुटत नसेल तरच पीडितेला पुढील कारवाईचा सल्ला देण्यात येतो़ गेल्या काही वर्षांत मात्र मध्यवर्गीय, गरिबांपेक्षा श्रीमंत घरांतील सर्वाधिक प्रकरणे महिला साहाय्य कक्षाकडे येत असल्याची माहिती महिला साहाय्य कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक कोलते यांनी दिली़

Web Title: women harassment does not stop; An average of two family harassment cases were reported daily in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.