Women's Day Special : अंगणवाडीतील २१ वर्षांच्या कष्टाचे झाले सोने : अलका चिंतामणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:02 PM2019-03-08T12:02:22+5:302019-03-08T12:04:32+5:30
मुलगी शिक्षिका तर मुलगा चीनमध्ये इंजिनिअर
- विशाल सोनटक्के
नांदेड : नवऱ्याची खाजगी नोकरी, त्यामुळे उत्पन्न अत्यल्प, त्यातच दोन चिमुकल्यांचे शिक्षण अशा स्थितीत कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न होता़ मात्र संकटाच्या काळातही न डगमगता परिस्थितीचा धैर्याने सामना केला़ घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी विद्यार्थ्यांची शिकवणी सुरू केली़ त्यानंतर अंगणवाडीत रुजू झाले़ आज दोन्ही मुले उच्चशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभी आहेत. अंगणवाडीत कार्यकर्ती म्हणून केलेल्या २१ वर्षांच्या कष्टाचे सोने झाल्यासारखे वाटते़, अशी प्रतिक्रिया आहे अलका चिंतामणी यांची.
नांदेड नजीकच्या बळीरामपूर अंगणवाडी क्रमांक ४ मध्ये कार्यरत असलेल्या अलका यांचे शिक्षण इयत्ता ११ वीपर्यंतचे़ पती खाजगी कंपनीत काम करीत होते़ एक मुलगा आणि मुलगी या दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलताना कसरत व्हायची. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचे क्लासेस घेण्यास सुरुवात केली़ पुढे १९९८ साली अंगणवाडीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. घरातील कामे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे आणि त्यानंतर पुन्हा चार तास अंगणवाडीत जाऊन शिकविताना कमालीची धावपळ व्हायची. मात्र कुटुंबाला उभे करण्यासाठी नोकरीची आवश्यकता होती़ त्यामुळे न थकता नियमित अंगणवाडीला जाऊ लागले़ त्यावेळी अवघे २०० रुपये मानधन मिळायचे़ मात्र याच मानधनातून कुटुंबाच्या गरजा भागत असल्याने ते माझ्यासाठी लाखमोलाचे होते.
सकाळी ८ ते १२ अशी अंगणवाडीची वेऴ त्यामुळे भल्या पहाटे उठून दोन्ही मुलांना शाळेसाठी तयार करायचे, त्यांच्या जेवणाचा डबा झाल्यानंतर मी अंगणवाडीसाठी निघायचे़ दुपारी अंगणवाडी सुटल्यानंतर पुन्हा मुलांच्या ओढीने घराकडे निघायचे़ अंगणवाडीतील मानधन अल्पसे असल्याने दुपारनंतर काही विद्यार्थ्यांचे क्लासेस घ्यायचे़ अशाच धावपळीत साधारण २१ वर्षांचा काळ लोटला़ आज राहुल अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन चीनमधील शांघाय येथील एका नामांकित कंपनीत सप्लाय मॅनेजर म्हणून काम करतो, तर मुलगी रुपाली आज परभणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे़ लहान असताना हीच रुपाली माझ्याबरोबर या अंगणवाडीत येऊन मी विद्यार्थ्यांना कशी शिकविते ते कौतुकाने पाहायची़ आज हे दोघेही स्वत:च्या पायावर उभे आहेत, याचा अभिमान वाटतो़ मुले स्थिरस्थावर झाल्यानंतर अंगणवाडीचे काम सोडून आमच्यासोबत राहा, अशी विनंती करतात़ मात्र इतकी वर्षे मी अंगणवाडीत कार्यरत राहिले़ या अंगणवाडीने मला माझ्या कुटुंबाला आधार दिला़ ती सोडायला नको वाटते़, असे त्या आवर्जून सांगतात़
परिस्थितीला शरण जाऊ नका
अंगणवाडी कार्यकर्तींना मिळणारे मानधन कमी आहे़ या सर्व कार्यकर्त्या आर्थिक दुर्बल घटकांतून आलेल्या असतात़ त्यामुळे घरच्या अडीअडचणीही असतात़ शासनाने या कार्यकर्तींना समाधानकारक वेतन देण्याची आवश्यकता आहे़ असे झाल्यास वाड्या-वस्त्यांवरील चिमुकल्यांना अधिक चांगले शिक्षण मिळेल. महिलांनी परिस्थितीसमोर हार न मानता कार्यरत राहिले पाहिजे़ तुम्ही चांगले काम करीत असाल तर निश्चितपणे तुमचे कुटुंब, समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो, याचा अनुभव मी अनेकदा घेतल्याचेही अलका चिंतामणी सांगतात.