Women's Day Special : स्मशानात आनंद शोधणाऱ्या जावा : पुष्पावती आणि शारदा पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:28 PM2019-03-08T12:28:23+5:302019-03-08T12:33:33+5:30
सरण आणि मरणाच्या सान्निध्यात फुलवला संसार
- श्रीनिवास भोसले
नांदेड : स्मशानभूमी म्हणजे भीतीचेच ठिकाण. तेथे आनंद आणि प्रसन्नता कशी फिरकणार? पण, ‘त्या दोघींनी’ स्मशानातही कुटुंबाला जगण्याचे बळ दिले. पुष्पावती आणि शारदा पवार. या दोघी जावा! सरण रचले. दफनविधीसाठी प्रसंगी खड्डाही खोदला. सरण आणि मरणाच्या सान्निध्यात या दोघींनी तब्बल ११ जणांचा संसार फुलविला.
पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी मसनजोगी समाज मराठवाड्यात सर्वत्र वास्तव्यास आहे. नांदेडच्या सिडको येथील स्मशानभूमीतही मसनजोगी समाजातील पवार कुटुंब राहाते. मारोती आणि बालाजी हे दोन्ही भाऊ आणि त्यांची मुले असे एकूण ११ जणांचे हे कुटुंब़ पवार कुटुंबाकडे पाहिल्यानंतर त्यांची केविलवाणी आर्थिक स्थिती लगेच समोर येते. मात्र, या परिस्थितीतही कुटुंबाच्या उभारणीसाठी हे कुटुंब एकजुटीने लढतेय. या कुटुंबातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पडेल ते काम करतात़ सरणासाठी लागणारे लाकूड, साहित्य देण्यापासून ते प्रसंगी सरण रचण्याचे कामही या महिला अत्यंत धाडसाने करताना दिसतात. मूळचे नांदेड तालुक्यातील निळा येथील असलेले हे पवार कुटुंब मागील १९ वर्षांपासून या स्मशानभूमीत निरंतरपणे काम करीत आहे़
या कुटुंबातील तिन्ही महिला पुरुषांच्या अनुपस्थितीत सरणासाठी लागणारे लाकूड देणे, सरण रचणे आदी काम धाडसाने करतात़ सरण रचताना तसेच दफनविधीसाठी खड्डा खोदतानाही त्या कचरत नाहीत. कुटुंबातील पुरुष मंडळी बाहेर गेल्यानंतर निर्भीडपणे त्या लेकराबाळांचा सांभाळ करतात. पवार यांच्या कुटुंबातील तीन मुली आणि दोन मुले असे पाच जण शेजारच्याच एका खाजगी शाळेत जातात. या मुलांना शिकवून अधिकारी झालेले पाहायचे आहे, असे स्वप्न या दोघींनी उराशी बाळगले आहे.
सरण, मरणाची भीती कसली?
स्मशानभूमीत दोन सरणजाळ्या आहेत़ अनेक वेळा या दोन्ही ठिकाणी सरण जळत असते़ अशा परिस्थितीत जळत्या सरणाच्या उजेडात राहावे लागते. कुटुंबात पाच लेकरं आहेत़ जन्मापासूनच ती या स्मशानभूमीत असल्याने त्यांना सरण, मरण अथवा प्रेताची भीती वाटत नाही. या लेकरांना शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभं राहिलेलं पाहायचं आहे. त्यासाठीच माझी धडपड सुरू असल्याचे पुष्पावती मारोती पवार सांगतात.
दफनविधीचा खड्डा खोदायलाही मागेपुढे पाहत नाही
काही महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी चार ते पाच जण लहान मुलाचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत आले़ लहान मूल असल्याने दफनविधी करायचा होता़ आमच्याकडील पुरुष मंडळी बाहेरगावी होती़ त्यामुळे स्वत: खड्डा खोदून त्या मुलाचा दफनविधी पूर्ण केला़ स्मशानभूमीत येणाऱ्या कोणत्याही मयताच्या नातेवाईकांना आम्ही लाकूड अथवा इतर विधीच्या पैशांसाठी तगादा लावत नाही़ त्यांच्याकडून स्वखुशीने मिळणाऱ्या भिक्षेमधूनच आमचा उदरनिर्वाह चालतो, असे शारदा बालाजी पवार यांनी सांगितले.