महिलांची कोटीच्या कोटी उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:12 AM2018-03-08T00:12:26+5:302018-03-08T00:13:26+5:30

महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आर्थिक चळवळ गतिमान होत आहे.‘मविम’ अंतर्गत असलेल्या आठ तालुक्यांतील बचत गटांनी तब्बल ९६ कोटी ७० लाख एवढी अंतर्गत कर्जाची उलाढाल केली आहे. या पद्धतीने अत्यंत कमी व्याजदारात कर्ज उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खाजगी सावकारीलाही मोठ्या प्रमाणात चाप बसला आहे.

Women's flyinf Crores | महिलांची कोटीच्या कोटी उड्डाणे

महिलांची कोटीच्या कोटी उड्डाणे

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील बचत गटांनी केली ९६ कोटींच्या अंतर्गत कर्जाची उलाढाल


विशाल सोनटक्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आर्थिक चळवळ गतिमान होत आहे.‘मविम’ अंतर्गत असलेल्या आठ तालुक्यांतील बचत गटांनी तब्बल ९६ कोटी ७० लाख एवढी अंतर्गत कर्जाची उलाढाल केली आहे. या पद्धतीने अत्यंत कमी व्याजदारात कर्ज उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खाजगी सावकारीलाही मोठ्या प्रमाणात चाप बसला आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचत गटांची ही चळवळ जोम धरत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १८१ गावांमध्ये या माध्यमातून प्रत्यक्ष काम सुरू असून या बचत गटांशी तब्बल २७ हजारांहून अधीधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून एकत्रित आणल्यानंतर या महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यास ‘मविम’च्या वतीने सुरूवात करण्यात आली. त्यातूनच या चळवळीने आर्थिकदृष्ट्या असे गोंडस बाळसे धरले आहे. गटाच्या माध्यमातून महिला एकत्रित आल्यानंतर त्यांना विविध लघुउद्योगांबाबत मार्गदर्शन देण्यात आले. त्यानंतर महिलांची आवड, उद्योगाची संधी आणि त्या भागाची निकड आदी बाबी तपासून हे गट उद्योगामध्ये उतरले.
याचप्रमाणे महिला बचत गटांच्या माध्यमातून अर्धापूर, नायगाव, चैनपूर (ता. देगलूर) येथे कृषीसेवा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. तर २९ गावांमध्ये महिला बचत गटांच्या वतीने पशू खाद्यविक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ४० गावांत महिलांनी दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. यात सुमारे १२०० महिला कार्यरत असून त्यांच्याकडे ३० ते १०० पशुधन आहे. शेळीपालनामध्येही महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. जवळपास २१०० महिला शेळीपालन व्यवसायामध्ये आहेत.
माविमच्या वतीने जिल्ह्यातील सुमारे ७५० महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यातील बहुतांश महिलांनी स्थानिक पातळीवर व्यवसायाला सुरूवात केली आहे. या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देण्याचे काम या महिला जोमाने करीत आहेत. याबरोबरच विविध गावांतील महिलांना गुरांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून जिल्ह्यातील ४५ गावांत सध्या या महिला पशुसखी म्हणून कार्यरत आहेत. यासर्व लघू उद्योगामुळे शहराबरोबच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून जिल्ह्यातील या बचत गटांच्या महिलांनी आजवर १२ कोटी ९ लाखांची एकूण बचत केली आहे.


1 अनेकदा महिलांना अचानक पैशाची गरज पडते. त्यावेळी हेच बचतगट या महिलांसाठी धावून जात असल्याचे दिसून येते. मागील काही वर्षांत जिल्ह्यातील बचत गटांनी तब्बल ९६ कोटी ७० लाख एवढ्या रकमेची अंतर्गत उलाढाल केली आहे़
2 विशेष म्हणजे, बचत गटाच्या व्याजदराप्रमाणे अवघ्या २ टक्क्यांत गरजूंना कर्ज उपलब्ध होत असल्याने संकटकाळी हे गट महिलांना मोठा दिलासा देणारे ठरत आहेत.
3 पिंपळगाव परिसरात असलेल्या सुमारे २० बचत गटांना तर वार्षिक एक ते दीड लाख व्याज मिळू लागले असल्याने या गटांनी आता बँकेला आम्हाला कर्ज नको म्हणून सांगण्यास सुरूवात केली आहे.
परतफेडीचे प्रमाण ९९ टक्के
कर्ज वसुली हा बँकिंग क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकदा कर्ज वसुली होत नसल्याने कर्जदार संकटात येतोच. याचबरोबर थकित कर्जामुळे पतसंस्था बँकांनाही टाळे ठोकण्याची वेळ आल्याचे दिसून येते. मात्र, महिला बचत गटांना वितरीत केलेले कर्ज हमखास वसूल होते असेच या बचत गटांच्या व्यवहाराकडे पाहिले असता निदर्शनास येते. बचत गटांनी तब्बल ४५ कोटींहून अधिकची कर्जे घेतली असली तरीही या कर्जाची परतफेड ही तितक्याच प्रामाणिकपणे केल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील बचत गटांच्या कर्ज परतफेडीचे प्रमाण हे ९९ टक्के आहे.

महिला बचत गटामुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिक सक्षम होत असून त्या कुटुंबासाठी आधार ठरत आहेत. ही चळवळ जिल्ह्यात अधिक गतिमान व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बचत गटांना कृषी अवजारे मिळावीत, गारमेंट सेंटरला साहित्य द्यावे, मुद्रा योजनेचा प्रचार व प्रसाराचे काम मिळावे तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान या गटांच्या माध्यमातून राबवावे आदी प्रस्ताव प्रशासनाकडे देण्यात आले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास ही चळवळ आणखी बळकट होईल. - चंदनसिंग राठोड, जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ.

Web Title: Women's flyinf Crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.