विवाहीतेने लग्नानंतर सहा महिन्यातच मृत्यूला कवटाळले; पती, सासरा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 07:23 PM2020-11-05T19:23:34+5:302020-11-05T19:25:02+5:30
माहेरवरुन पैसे आणण्यासाठी केला छळ
नांदेड : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने लग्नानंतर अवघ्या सह महिन्यातच आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी रात्री शहरातील विष्णूपुरी भागात घडली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पतीसह सासऱ्यास अटक करण्यात आली आहे.
मुदखेड येथील गोविंद नातेवाड यांची मुलगी अंकीता हिचा विवाह ८ मे २०२० रोजी विष्णूपुरी येथील दीपक अनंतवार यांच्यासोबत पार पडला. परंतु लग्नानंतर काही दिवसातच पती दीपक अनंतवार, सासरा बाळासाहेब अनंतवार आणि नणंद पूजा निळकंठवार हे विवाहितेचा छळ करू लागले. रो हाऊससाठी काढलेले कर्ज फेडण्यासाठी तसेच मेडीकलच्या व्यवहारासाठी माहेरहून दोन लाखाची रक्कम घेवून हे अशी मागणी करण्यात येत होती.
परंतु, पैशाची पूर्तता न झाल्याने सासरच्या मंडळीकडून छळ वाढत गेला. अखेर ४ नोव्हेंबर रोजी अंकीताने राहत्या घराच्या मजल्यावरील पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी गोविंद नातेवाड यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पती व सासऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.