साहेबांसाठी चपला झिजल्या,आता ‘वारसदार’ मैदानात; सामान्य कार्यकर्त्यांना संधी केव्हा मिळणार?

By श्रीनिवास भोसले | Published: April 11, 2023 04:31 PM2023-04-11T16:31:14+5:302023-04-11T16:31:30+5:30

आता ताई-दादा! आमचं काय? राजकारण नेहमीच ठराविक कुटुंबाभोवती फिरत असल्याने सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी गुलाल लागणार?

work effortless for Saheb, now the 'heir' in field; When will ordinary workers get a chance? | साहेबांसाठी चपला झिजल्या,आता ‘वारसदार’ मैदानात; सामान्य कार्यकर्त्यांना संधी केव्हा मिळणार?

साहेबांसाठी चपला झिजल्या,आता ‘वारसदार’ मैदानात; सामान्य कार्यकर्त्यांना संधी केव्हा मिळणार?

googlenewsNext

नांदेड : पक्ष कोणताही असो झेंडा अन् दांडा हा कार्यकर्त्यांच्या हाती असतो. निवडणुकीनंतर गुलाल उधळण्याचे कामही हीच कार्यकर्ते मंडळी उत्साहाने करते; परंतु, साहेब आमदार, खासदार झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी संधी मिळेल म्हणून चपला झिजवणाऱ्या बहुतांश निष्ठावंत कार्यकर्त्यांच्याही पदरी निराशाच पडते. जिल्ह्यातील राजकारण नेहमीच ठराविक कुटुंबाभोवती फिरत असल्याने सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी गुलाल लागणार? आगामी  निवडणुकांत वारसदारांच्या चर्चेने इच्छुकांचा आवाज दाबला जात आहे.

जिल्ह्यातील बहुतांश पालिका, नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. आजघडीला महाविकास आघाडीमुळे काँग्रेससोबत शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी सोबत असल्याने भाजप अन् शिवसेना (शिंदे गट) यांच्यापेक्षा अधिकची ताकद महाविकास आघाडीचीच आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी देऊन तीनही पक्षाची मोट बांधून ठेवण्याची किमया माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना साधावी लागणार आहे. त्यात बहुतांश आमदारांचे पुत्र, कन्या अथवा पत्नी, भाऊ राजकारणात येऊ पाहत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपला राजकीय वारस पुढे आणण्याचे काम नेत्यांकडून केले जाईल. त्यासाठी त्यांना जिल्हा परिषद, महानगरपालिका अथवा इतर कोणत्या न कोणत्या निवडणुकीत राजकीय आखाड्यात उतरविले जाईल. परंतु, साहेबांना आमदार करण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय मग केवळ सतरंज्याच उचलत राहायच्या का, असा सवाल इच्छुक कार्यकर्त्यांकडून दबक्या आवाजात उपस्थित केला जात आहे. आमदारांच्या कुटुंबातील कोणीतरी पुढे आले की कार्यकर्ते आपली इच्छादेखील व्यक्त करण्याचे सोडून देत आहेत. आजघडीला जिल्ह्यातील बहुतांश आमदारांच्या कुटुंबात कोणी न कोणी जिल्हा परिषद, महानगरपालिकेची तयारी करत आहे. तर काही नेत्यांनी मात्र  वारसाला राजकारणापासून कोसोदूर ठेवले आहे.

दिग्गजांचे हे वारसदार राजकीय इनिंगच्या तयारीत
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची राजकीय वारस म्हणून श्रीजया चव्हाण भोकर अथवा नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे राजकीय गोटात बोलले जात आहे. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही राजकीय एन्ट्रीची शक्यता नाकारता येत नाही.
खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी मुलगी प्रणिता देवरे यांना आमदार करण्याचा प्रण केला आहे. त्यांना दक्षिण विधानसभा मतदारसंघ अथवा लोहा-कंधारमधून मैदानात उतरविले जाऊ शकते. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय वलय आणि कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले आहे.
माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी स्नुषा डॉ. मीनल खतगावकर यांना राजकीय वारस म्हणून पुढे आणले आहे. त्या व्यवसायाने डॉक्टर; परंतु, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात एन्ट्री करुन त्यांनी आपले कर्तृत्वही सिद्ध केले आहे. त्या नायगावमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे राजकीय वारस म्हणून प्रा. रवींद्र चव्हाण देखील आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहेत.

लेक अन् पत्नीला हवे मिनी मंत्रालय...
हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील यांनी कन्या नेहा पाटील, किनवटचे आमदार भीमराव केराम यांचे चिरंजीव ॲड. प्रतीक केराम, आमदार मोहनराव हंबर्डे यांचे चिरंजीव राहुल हंबर्डे, तर आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या पत्नी ज्योत्स्ना राठोड, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी संध्या कल्याणकर या आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवू इच्छित आहेत. त्यादृष्टीने ठराविक सर्कलमध्ये राबता वाढविल्याचे दिसून येत आहे.

या नेत्यांनी वारसदारांचा मार्ग बदलला...
माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दीर्घकाळ राजकारण केले. परंतु, आपल्या मुलाला आणि मुलीला राजकारणापासून दूर ठेवले. तसेच माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांची मुलगी नेहा किन्हाळकर या खासगी कंपनीत मोठ्या पदावर विराजमान आहेत. माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या दोन्ही कन्या राजकारणापासून दूर आहेत. तर विद्यमान आमदार राजेश पवार यांची दोन्ही मुलं अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असून मोठा मुलगा सध्या बिझनेस सांभाळत आहे.

Web Title: work effortless for Saheb, now the 'heir' in field; When will ordinary workers get a chance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.