सिंचनाची कामे प्राधान्याने सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:45 IST2019-06-27T00:45:09+5:302019-06-27T00:45:36+5:30
गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील आठ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे़

सिंचनाची कामे प्राधान्याने सोडविणार
भोकर : गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील आठ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे़ यापुढेही जिल्ह्यातील सिंचनाची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असून लवकरच सुधा प्रकल्पाची उंची, वाघु नदीवरील पिंपळढव प्रकल्प, दिवशी येथील साठवण तलाव आदी कामे मार्गी लागतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.
तालुक्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिंचनाच्या मागणीला शासनाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रावणगाव, पिंपळढव येथे बुधवारी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, जि.प. सदस्य तथा कार्यक्रमाचे संयोजक बाळासाहेब रावणगावकर, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, जगदीश पाटील भोसीकर, उपसभापती सूर्यकांत बिल्लेवाड, गणेश राठोड, गुलाबराव चव्हाण, रामचंद्र मुसळे, बाबूराव सायाळकर, उज्ज्वल केसराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना संबंधित विभागाकडून गोदावरी खोºयात पाणी उपलब्धता नसल्याचे कारण सांगितले जात होते. यावर वेळोवेळी शासनस्तरावर बैठका घेवून बाजू मांडून पाठपुरावा करण्यात आला.
तसेच गोदावरी खोºयात शंभर टक्के साठवणूक होत नाही आणि २९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो अशी भूमिका मांडली़ नियोजन आणि जलव्यवस्थापन नाशिक यांनी हे म्हणणे मान्य करीत २० जून रोजी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देवून तालुक्यातील रेणापूर सुधा प्रकल्पाची १.१० मीटर उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे २ द.ल.घ.मी. पाणीसाठा वाढून १५० हेक्टर अधिक भाग सिंचनाखाली येणार आहे. तर पिंपळढव येथील वाघु नदीवरील प्रकल्पास मंजुरी मिळून १०७ चौरस किमी क्षेत्रात पाणी साठवण होवून ७०० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे तर दिवशी येथील प्रकल्पासही मंजुरी मिळाली आहे. उर्वरित पाकी येथील काळडोह साठवणतलाव व जाकापूर साठवण तलावाचाही मार्ग मोकळा झाला आहे.
चव्हाण यांचा खासदार चिखलीकरांना टोला
आठ वर्षांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे सर्व शक्य झाले असून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी एका महिन्यातच याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. 'काल तूप खाल्लं आणि आज रुप आलं' असं होत नसतं, अशा शब्दात खा.चिखलीकर यांचे नाव न घेता चव्हाण यांनी त्यांना टोला लगावला. यावेळी आनंदराव पाटील, शंकरराव तोटेवाड, परमेश्वर वाघमारे, गिरीश कदम, वसंत जाधव, गंगाधर भोंबे, साईनाथ कोटुरवार आदी उपस्थित होते़
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र सरपंच व नागरिकांना दिले़ तेव्हा ग्रामस्थांनी पिंपळढव परिसरातील वाघु नदीवर साठवण तलाव होणार असल्याच्या आनंदात पेढे वाटण्यात आले़