गोदावरी नदीतील वनस्पती काढण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 07:59 PM2018-05-07T19:59:35+5:302018-05-07T19:59:35+5:30
गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कंद वनस्पती काढण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. गोदावरी जीवरक्षक दलाच्या सहायाने ही वनस्पती काढली जात आहे.
नांदेड : गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कंद वनस्पती काढण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. गोदावरी जीवरक्षक दलाच्या सहायाने ही वनस्पती काढली जात आहे.
गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात मागील काही दिवसांपासून वनस्पती वाढत असल्याचे दिसून आले. ही वनस्पती कंद वनस्पती असल्याचे पुढे निष्पन्न झाले. या वनस्पतीचे प्रमाण वाढतच होते. ते काढण्याचे काम महापालिकेने महाराष्ट्र दिनापासून सुरू केले आहे. शहरातील नावघाट, नगिनाघाट, गोवर्धनघाट, बंदाघाट, काळेश्वर घाट, तारातीर्थ घाट आदी १२ घाटांवर वाढत असलेली ही वनस्पती काढण्याचे काम सुरू आहे.
गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा विषय पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गांभीर्याने घेतला आहे.
गोदावरी नदीचे शुद्धीकरण झालेच पाहिजे, ही भूमिका घेत शहरातील सांडपाणी गोदावरीत कोणत्याही परिस्थितीत सोडले जाऊ नये, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. या आदेशानुसार शहरातील सांडपाणी पंपिंग स्टेशनवर नेले जात आहे. आता त्यातच कंद वनस्पतीचे संकट पुढे आले. मोठ्या झपाट्याने ही वनस्पती वाढत आहे. परिणामी गोदावरीच्या प्रदूषणात वाढच होत आहे. त्यामुळे महापालिकेपुढील चिंतेत वाढच होत होती.
महापालिकेने शहरातील गोदावरी जीवरक्षक दलाला कंद वनस्पती काढण्याचे काम सोपविले आहे. हे काम मागील चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. आगामी दहा-बारा दिवसांत बारा घाटांवर वाढत असलेली कंद वनस्पती काढण्याचे काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.