अमृत जलवाहिनी टाकण्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:51 AM2019-05-09T00:51:23+5:302019-05-09T00:53:52+5:30
अमृत योजनेअंतर्गत शहरातील जुन्या नांदेडातील प्रभाग क्र. १५ मध्ये ३०० फूट पाणी पाईपलाईनला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु दोन वर्षे उलटले तरी सदर काम पूर्ण झालेले नसल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
नांदेड : अमृत योजनेअंतर्गत शहरातील जुन्या नांदेडातील प्रभाग क्र. १५ मध्ये ३०० फूट पाणी पाईपलाईनला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु दोन वर्षे उलटले तरी सदर काम पूर्ण झालेले नसल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत जुन्या नांदेड भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत राजाभाऊ सिंगेवार ते व्यंकटी देबडे यांच्या घरापर्यंत ३०० फूट पाण्याच्या पाईपलाईनला मंजुरी देण्यात आली. सन २०१७ अखेर या कामाला मंजुरी मिळूनही सदर योजनेचे काम पूर्ण झालेले नाही.
योजनेला गती देण्यासाठी या भागातील नागरिकांनी अनेकवेळा संबंधितांना निवेदने दिली. तसेच आंदोलनेही केली. मात्र त्यानंतरही पाणी पाईपलाईन कामाला गती मिळालेली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
अमृत योजनेतंर्गत शहरात होत असलेली कामे संथगतीने सुरू आहेत़ त्याचवेळी मोठ्या प्रमाणात अर्धवट राहिले असल्याने या योजनेचा उद्देश सफल होत नसल्याचे स्पष्ट आहे़ अनेक भागात जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असले तरी त्या जलवाहिन्यांना मुख्य वाहिनीवर जोडणी दिली नसल्याने पाणीपुरवठा सुरू होऊ शकला नाही़