यवतमाळसह मराठवाड्यातील चार जिल्ह्यांचे कार्यकर्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:52 AM2019-04-07T00:52:09+5:302019-04-07T00:53:08+5:30
मामा चौकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठा जनसागर लोटला होता़ नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर यासह यवतमाळ जिल्ह्यातून नागरिक सभास्थळी आले होते़
शिवराज बिचेवार ।
नांदेड : मामा चौकातील पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठा जनसागर लोटला होता़ नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर यासह यवतमाळ जिल्ह्यातून नागरिक सभास्थळी आले होते़
क्रुझर, जीप, आॅटो, टेम्पो, ट्रकसह मिळेल त्या वाहनाने लोकांचे जथ्थे मोदी यांच्या सभेसाठी आले होते़ नांदेडसह हिंगोली, परभणी, लातूर या चारही जिल्ह्यांतील लोकसभा उमेदवार या सभेला उपस्थित होते़ त्यामुळे त्यांनी आपआपल्या जिल्ह्यातील कार्यकर्ते आणले होते़ दुपारी तीन वाजेपासूनच सभास्थळाकडे नागरिक जात होते़ दुपारपर्यंत नांदेडच्या तापमानाचा पारा अधिक होता़ परंतु, सायंकाळी पाच वाजेनंतर ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाला़ सायंकाळी सहा वाजेनंतर मात्र सभास्थळी येणाऱ्यांची संख्या वाढली होती़ यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती़ अनेकांनी सहकुटुंब मोदी यांच्या सभेला हजेरी लावली़ यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी आल्याचे सांगितले़ तर काहींनी त्यांचे भाषण मनाला भावत असल्याचे म्हटले़ यावेळी चिमुकल्यांसह तरुणांनी मोदी यांचा मुखवटा घातला होता़ सभेला तरुणांची गर्दीही लक्षणीय होती़ तरुणाईने सरकारच्या रोखठोक निर्णयांचे स्वागत केले़ सभा आटोपल्यानंतर मात्र वाहनांची एकच गर्दी झाली.
वेट अॅण्ड वॉच
जागेसाठी तीन तास आधी आलो...
सायंकाळी सहा वाजता सभा सुरु होणार होती़ परंतु सभास्थानी समोर जागा जागा मिळावी म्हणून नागरिकांनी दुपारी तीन वाजेपासूनच मैदानात येण्यास सुरुवात केली होती़ यावेळी नागरिकांनी व्यासपीठ व मैदानावर सेल्फी घेतले़ तर काही जण गटातटाने बसून निवडणूक कशी रंगतदार झाली याबाबत चर्चा करीत होते़ तर कुणी सभांमुळे पोलीस यंत्रणेवर पडणारा ताण, यासाठी केला जाणारा खर्च किती अवाढव्य असेल, याचाही अंदाज बांधत होते़
सभेसाठी आलेल्या महिला म्हणतात...
महागाई कमी करणारे सरकार यावे...
मोदी यांच्या सभेत महिलांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती़ या सभेला महिलांसह महाविद्यालयीन तरुणीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़ यावेळी सुरेखा पवार या महिलेने देशात महागाई कमी करणारे सरकार येणे गरजेचे आहे़ सरकारने महिलांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे म्हटले़ तर सुप्रिया पाटील ही विद्यार्थिनी म्हणाली, सरकारने विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी काही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे़ आज ग्रामीण भागात पैसे नसल्यामुळे अनेक मुली आत्महत्या करीत असल्याचेही तिने नमूद केले़
असे होते सभेचे नियोजन
दहा ठिकाणी पार्कींगची व्यवस्था
सभेसाठी मोठ्या संख्येने वाहनांनी कार्यकर्ते येणार हे लक्षात घेत पोलिसांनी सभास्थळाच्या समोरच्या बाजूने दहा पार्किंग स्थळे निश्चित केली होती़ समोरील मोकळ्या प्लाटची त्यासाठी स्वच्छता करण्यात आली होती़ त्याचबरोबर सभास्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी अनेक रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली़ योग्य नियोजनामुळे कुठेही वाहतुकीची कोंडी झाली नाही़