नांदेडमध्ये किटकॅट चॉकलेटमध्ये निघाली अळी, ग्राहकाची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 09:01 PM2023-02-16T21:01:25+5:302023-02-16T21:02:04+5:30
अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या सुपर मार्केटमधील नेस्ले कंपनीच्या सर्व चॉकलेटचा साठा सील केला.
नांदेड : शहरातील एका नामांकीत सुपर मार्केटमध्ये खरेदी केलेल्या नेस्ले कंपनीच्या किटकॅट चॉकलेटमध्ये अळी निघाल्याचा प्रकार १६ फेब्रुवारी रोजी घडला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने सुपर मार्केटमधील नेस्ले कंपनीच्या चॉकलेटचा सर्व साठा सील केला आहे.
यशोधरा नगर भागातील सुभाष दिगंबरराव भंडारे हे १६ फेब्रुवारी लातूर फाटा भागातील एका नामांकीत सुपर मार्केटमध्ये खरेदीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी मुलांसाठी नेस्ले कंपनीचे किटकॅट चॉकलेट खरेदी केले. हे चॉकलेट खाण्यासाठी त्यांनी फोडले असता त्यामध्ये चक्क अळी निघाली. ही बाब त्यांनी सुपर मार्केटच्या व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तातडीने अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधून लेखी तक्रार केली. सुपर मार्केटमधील नेस्ले कंपनीच्या सर्व ब्रँडच्या सर्व बॅचच्या खाद्य पदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी करावी, लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नांदेडमध्ये किटकॅट चॉकलेटमध्ये निघाली अळी, ग्राहकाची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार#nandedpic.twitter.com/2EUPiic2MN
— Lokmat (@lokmat) February 16, 2023
चॉकलेटमध्ये अळी निघाल्यासंदर्भातील तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नामांकीत सुपर मार्केटमध्ये जाऊन तेथील नेस्ले कंपनीच्या सर्व चॉकलेटची तपासणी केली व हा साठा सील केला. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय चट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेश मरेवाड, संतोष कनकावाड यांनी ही कारवाई केली. तक्रार प्राप्त झालेल्या सुपर मार्केटमधील नेस्ले कंपनीच्या चॉकलेटचा संपूर्ण साठा सिल केला आहे. तसेच चॉकलेटचे नमुने पुणे येथील अन्न प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत, असे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.