चिंताजनक ! मिसरुड न फुटलेल्यांच्या हाती कट्टा; गल्लीबोळात तयार झाल्या गँग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 01:48 PM2022-04-08T13:48:46+5:302022-04-08T13:50:02+5:30

टोळी प्रमुख जेलमध्ये मात्र टोळीतील अल्पवयीन मुले मात्र अजूनही देशी कट्टे दाखवून खंडणी वसुली, लुटमार करीत आहेत.

Worrying! Cut in the hands of the Egyptians; Gangs formed in the alleys | चिंताजनक ! मिसरुड न फुटलेल्यांच्या हाती कट्टा; गल्लीबोळात तयार झाल्या गँग

चिंताजनक ! मिसरुड न फुटलेल्यांच्या हाती कट्टा; गल्लीबोळात तयार झाल्या गँग

Next

नांदेड : एकेकाळी सहजपणे तलवारी मिळण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या नांदेडात आता तेवढ्याच सहजपणे काही हजारात देशी कट्टे मिळत आहेत. मध्यप्रदेशातून अकोला मार्गे जिल्ह्यात येणारी ही हत्यारे मिसरुड न फुटलेल्या मुलांच्या हाती पडल्यानंतर ते भल्या-भल्यांना खंडणीसाठी धमकावत आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या टोळ्यातील प्रमुख गजाआड असले तरी, त्यांचे कच्चे-बच्चे मात्र हैदोस घालत आहेत. रेकॉर्डवर त्यांची नोंद नसल्यामुळे पोलीसही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत.

२०१९ या वर्षात जिल्ह्यात कुख्यात आणि खलिस्तानी चळवळीचा समर्थक असलेल्या हरविंदरसिंग रिंदाची दहशत होती. वैयक्तिक दुश्मनीतून त्याचे माळी परिवाराशी बिनसले होते. त्यावेळी महिनाभराच्या काळातच भरदिवसा गोळीबार करून तिघांचा खून करण्यात आला होता. तसेच रिंदाने शहरातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन कोट्यवधींची खंडणी ही वसूल केली. विशेष म्हणजे खंडणी वसुलीच्या या धंद्यात स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यानेही त्याला साथ दिली. आता दिघोरे आणि रिंदाच्या टोळीतील जवळपास १५ जण तुरुंगात आहेत. त्यानंतर विक्की चव्हाण आणि विक्की ठाकूर यांच्यामध्ये खंडणी वसुलीच्या हद्दीवरून टोळीयुद्ध पेटले होते. त्यात अगोदर कामठा रस्त्यावर विक्की चव्हाणचे अपहरण करून हाल-बेहाल करून मारण्यात आले. त्याचा बदला घेण्यासाठी विक्की ठाकूरचा गाडीपुरा भागात खून करण्यात आला.

या दोन्ही गँगच्या वादातून शहरात अनेकवेळा गोळीबार झाला. न्यायालयातही या दोन्ही टोळ्या पोलिसांसमोरच आपसात भिडल्या होत्या, हे विशेष. पोलिसांनी या दोन्ही टोळीतील ३० हून अधिक जणांना अटक केली. त्यामुळे काही काळ शहरात शांतता होती. तोच कैलास बिगानिया टोळीने तोंड वर काढले. या टोळीने अगोदरच्या सर्व गँगची जागा भरून काढण्याच्या प्रयत्नात खंडणीसाठी धमकावण्याचा सपाटाच सुरू केला होता. ही टोळीही सध्या तुरुंगात आहे. परंतु टोळीतील अल्पवयीन मुले मात्र अजूनही देशी कट्टे दाखवून खंडणी वसुली, लुटमार करीत आहेत. दोन महिन्यापूर्वीच बाफना भागात जिनिंगचे ५० लाख लांबविण्यात आले होते.

गुन्हेगारी टोळ्यांवर लावला अंकुश
जिल्ह्यातील रिंदा, विक्की चव्हाण, विक्की ठाकूर, कैलाश बिगानिया टोळीतील ५० हून अधिक आरोपी सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यापैकी काही जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी खंडणीसाठी फोन आल्यास न घाबरता गोपनीय तक्रार करावी, असे आवाहन विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले आहे.

शारदानगर भागात तीन खून
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी राहत असलेल्या शारदा नगर भागात मागील काही दिवसांत खुनाच्या तीन घटना घडल्या आहेत. एकतर्फी प्रेमातून घरात घुसून तरुणाची हत्या करण्यात आली. पाठलाग करून एका तरुणाचा मित्रांनी खून केला, तर दोन दिवसांपूर्वी बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Web Title: Worrying! Cut in the hands of the Egyptians; Gangs formed in the alleys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.