यवतमाळचे पाणी गांजेगावपर्यंत पोहचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:43 AM2018-12-15T00:43:14+5:302018-12-15T00:45:52+5:30
गेल्या १५ दिवस बेमूदत आंदोलन केल्यानंतर मंजूर करण्यात आलेले २ दलघमी पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार यवतमाळचे पाणी गांजेगाव बंधाऱ्यापर्यंत पोहचले़
हिमायतनगर : गेल्या १५ दिवस बेमूदत आंदोलन केल्यानंतर मंजूर करण्यात आलेले २ दलघमी पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार यवतमाळचे पाणी गांजेगाव बंधाऱ्यापर्यंत पोहचले़
परंतु नांदेड जिल्ह्याचे मंजूर ७ दलघमी पाणी अद्याप बोरीच्या पुलापर्यंत देखील आले नसल्याने शेतकरी वर्गात प्रशासनाच्या धीम्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडून दिलासा द्यावा, अन्यथा शेतक-यांना पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा नदीकाठावरील शेतक-यांनी दिला आहे.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी ही नदीकाठावरील गावक-यांची कामधेनू आहे. या नदीमध्ये गेल्या ४ महिन्यापासून पाणी नसल्यामुळे दोन्ही भागातील ९० गावच्या शेतक-यांनी आंदोलन केले होते़ त्यानंतर शासनाला जाग आली. १५ व्या दिवशी नांदेड जिल्हाधिका-यांनी ७ दलघमी आणि यवतमाळच्या जिल्हाधिकारी यांनी ५ दलघमी पाणी सोडण्यास मंजुरीचे पत्र आंदोलनकर्त्यांना देऊन इसापूरचे कार्यकारी अभियंता कुरुंदकर यांना तसे आदेश दिले होते़यास जवळपास ९ दिवस लोटले असून यवतमाळ जिल्ह्याचे पाणी पैनगंगा नदीच्या गांजेगाव पुलापुढे गेले असताना देखील नांदेड जिल्हाधिकारी यांनी मंजूर केलेले ७ दलघमी पाणी अद्यापही आंदोलन केलेल्या नदीपात्रात पोचले नाही. त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी यांनी मंजुरीच्या दिलेल्या पत्रानुसार पाणी सोडण्यात कुचराई केली की काय..? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ मराठवाड्याचे मंजूर पाणी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे सहस्त्रकुंड पर्यंत सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे़
- विदर्भाच्या भागातून पैनगंगा नदीपात्रात आलेले पाणी अजूनही पळसपूरपर्यंत पोहचले नाही़ दरम्यान गांजेगाव बंधा-याखालील शेतक-यांनी निवेदन देऊन गेट काढण्याची मागणी केल्याने गुरुवारी दुपारी दोन गेट काढण्यात आले आहे.
त्यामुळे पळसपूर, कोपरा वासियांना पुन्हा पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेता मराठवाड्याचे पाणी नदीपात्र सोडण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे़ त्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या तयारी आहेत़