यंदा शैक्षणिक सहलींना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:22 AM2018-12-25T00:22:28+5:302018-12-25T00:25:08+5:30
शिक्षण विभागाच्या जाचक अटीमुळे यंदा शालेय सहली काढण्यासाठी कुठलीही शाळा धजावत नसल्याची सध्या सर्वत्र परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा शैक्षणिक सहलीला ‘ब्रेक’ लागल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
धर्माबाद : शिक्षण विभागाच्या जाचक अटीमुळे यंदा शालेय सहली काढण्यासाठी कुठलीही शाळा धजावत नसल्याची सध्या सर्वत्र परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा शैक्षणिक सहलीला ‘ब्रेक’ लागल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
सहल ही शैक्षणिक उपक्रम मानला जातो. पर्यटनस्थळासह, ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक माहिती मिळवून त्याचे दर्शन घडावे, या उद्देशाने प्रत्येक शाळेत शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. यंदाही अनेक शाळांनी तशी तयारी केली होती. विद्यार्थ्यांमध्येही सहलीबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती; पण शिक्षण विभागाच्या जाचक अटीमुळे अनेक शाळांनी सहली न काढण्याचा विचार केला आहे.
धर्माबाद तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५६ शाळा व खाजगी १२ शाळा आहेत. यावर्षी एकाही शाळेची सहल गेली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. डिसेंबर महिना आला की सहलीची सर्वच शाळांतून लगबग सुरू होते. मात्र शिक्षण विभागाने यावर्षी सहलीबाबत एक परिपत्रक काढून नियमावली दिली आहे. त्यात- अपघात होतील अशा निसर्गरम्यस्थळी सहल काढू नये, ज्ञानात भर पडेल अशा शैक्षणिक अभ्यासात्मक व संशोधनात्मक ठिकाणी सहली काढाव्यात, सहल नेणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शंभर रुपयांच्या बाँडवर हमीपत्र लिहून देणे, सर्व विद्यार्थ्यांचा विमा उतरल्याच्या प्रती परवानगीसोबत जोडाव्यात, सहलीस जाणाºया विद्यार्थ्याच्या रक्तगटाची माहिती परवानगीसोबत जोडणे आवश्यक, सहलीस जाणारी मुले शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र मुख्याध्यापकांनी जोडणे बंधनकारक आहे तसेच पालक व विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेणे आवश्यक आहे़ या शिक्षण विभागाच्या जाचक अटी यावर्षी शैक्षणिक सहलीवर लावल्यामुळे अनेक शाळांमधून शैक्षणिक सहली नेण्याला ‘ब्रेक’ लागलेला दिसून येत आहे.
किल्ले, वस्तूसंग्रहालयाचे ज्ञान मिळणार नाही
विविध प्रकारचे किल्ले, वस्तूसंग्रहालये, सांस्कृतिक ठिकाण, पर्यटनस्थळ, समुद्र किनारे ही ठिकाणे पाहणे आता विद्यार्थ्यांना अवघड बनणार आहे. यामुळे त्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळणार नाही.तसेच विविध घटकांचे अवलोकन होणार नाही. यामुळे विद्यार्थीदशेतील शैक्षणिक सहलीच्या आनंदाला विद्यार्थी मुकणार आहेत.
विद्यार्थ्यांचा हिरमोड
विद्यार्थ्यांमध्ये सहलीविषयी प्रचंड आकर्षण असते. कधी सहल निघेल, कुठे जाणार, कुठली प्रेक्षणीय स्थळे असतील याबाबत विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आणि उत्सुकता असते. त्यासाठी महिनाभर आधीपासूनच तयारी सुरु केली जाते. यंदा मात्र सहलीविषयी शाळेत चर्चाच होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचाही हिरमोड झाला आहे.