यंदा नांदेड जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटला; ११२ प्रकल्पांमध्ये ७१ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 06:43 PM2020-09-09T18:43:59+5:302020-09-09T18:45:35+5:30
११२ प्रकल्पांपैकी ४५ प्रकल्प १०० टक्के भरले
नांदेड : जिल्ह्यातील ११२ जलप्रकल्पांमध्ये ५३६.०६ दलघमी उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे. या साठ्याची टक्केवारी ७१.८५ टक्के इतकी आहे. या जलसाठ्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.जिल्ह्यात २ मोठे प्रकल्प असून विष्णूपुरी जुलैमध्येच तुडुंब भरले आहे. या प्रकल्पाचे दरवाजे अनेकदा उघडावे लागत आहेत तर दुसरीकडे मानार प्रकल्पही ८० टक्के भरला आहे. या प्रकल्पात ११०.४२ दलघमी जलसाठा झाला आहे. जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पांत १२७.१२ दलघमी साठा झाला आहे.
जिल्ह्यात ९ उच्चपातळी बंधारे आहेत. त्यामध्ये आमदुरा, अंतेश्वर हे बंधारे १०० टक्के भरले आहेत. बळेगाव उच्च पातळी बंधाराही ७१.१९ टक्के इतका भरला आहे. अन्य बंधारे मात्र कोरडेच आहेत. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर माहूर तालुक्यातील मारेगाव, दिगडी, किनवट तालुक्यातील मोहपूर, भंडारवाडी आणि हिमायतनगर तालुक्यातील मंगरुळ बंधारा कोरडाच आहे. या तीन बंधाऱ्यांमध्ये ७३.७९ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे.
जिल्ह्यात ८८ लघु प्रकल्प आहेत. या लघुप्रकल्पामध्ये १४४.३४ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे. लघु प्रकल्पांत ७५.६५ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. लघु प्रकल्पामध्ये लोहा तालुक्यातील सुनेगाव, कंधार तालुक्यातील वाहद, पानशेवडी, घागरदरा, मुखेड तालुक्यातील मुखेड, आखरगा, सोनपेठवाडी, शिरुर, वसूर, देगलूर तालुक्यातील भूतनहिप्परगा, अंबुलगा, येडूर, बिलोली तालुक्यातील दर्यापूर, उमरी तालुक्यातील गोरठा, हदगाव तालुक्यातील पिंपराळा, चाभरा, सायाळवाडी, हिमायतनगर तालुक्यातील दुधड, सुना, कंधार तालुक्यातील मोहिजा परांडा, लोहा तालुक्यातील टाकळगाव, भोकर तालुक्यातील रेणापूर, सुधा, किनवट तालुक्यातील मुळझरा, थोरा, जलधारा, सिंदगी, पिंपळगाव, अंबाडी, वनसांगवी, सिरपूर, मांडवी, निराळा, सिंदगी, लक्कडकोट, माहूर तालुक्यातील वझराशेख आणि लोहा तालुक्यातील आडगाव लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. नांदेड पाटबंधारे मंडळात ११२ जल प्रकल्प आहेत. त्यातील ४५ जलप्रकल्प हे १०० टक्के भरले आहेत.तर १३ प्रकल्प ज्योत्याच्या खालीच आहेत.
जिल्ह्यातील ९ पैकी ७ मध्यम प्रकल्प तुडुंब
जिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पांमध्ये १२७.१२ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्याची टक्केवारी ९१.४१ इतकी आहे. या मध्यम प्रकल्पामध्ये कुंद्राळा, करडखेड, कुदळा, पेठवडज, नागझरी, लोणी आणि डोंगरगाव मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. तर महापालिंगी प्रकल्प ९७.९७ टक्के आणि उर्ध्व मानार मध्यम प्रकल्प ८४.३४ टक्के भरला आहे. मध्यम प्रकल्पामध्ये सर्वाधिक जलसाठा उर्ध्व मानार प्रकल्पात आहे. ६३.८६ दलघमी पाणी या प्रकल्पात उपलब्ध आहे. करडखेड प्रकल्पात ११.० दलघमी, कुंद्राळा १०.४१ द.ल.घ.मी., डोंगरगाव ८.८१ द.ल.घ.मी., लोणी ८.३८ द.ल.घ.मी., पेठवडज ९.०५ द.ल.घ.मी., महालिंगी ४.६९ द.ल.घ.मी. आणि कुदळा मध्यम प्रकल्पात ४.३५ दलघमी जलसाठा आहे.