नांदेड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्याने घेतला १४ जणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 06:52 PM2020-10-14T18:52:12+5:302020-10-14T18:52:41+5:30
पुराच्या पाण्यात वाहून जाऊन तसेच विजा कोसळून प्रत्येकी ७ जणांचा मृत्यू
- सदानंद गजभारे
हदगाव : यंदा जिल्हाभरात दमदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले असतानाच पावसाने जिल्ह्यातील चौदा जणांचा बळीही घेतला आहे. यातील सात जण पुरात वाहून जावून मरण पावले. तर सात जणांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. जनावरांनाही पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला असून, पावसाळ्यात तब्बल १३६ जनावरे विविध कारणाने मृत्युमुखी पडली आहेत.
जून महिन्यातच जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे आलेल्या पुराने हदगाव तालुक्यातील धानोरा येथील संतोष मारोतराव कदम (४१) यांचा १९ जुलै रोजी वाहून जावून मृत्यू झाला. याच महिन्यात २० जुलै रोजी देगलूर तालुक्यातील हानेगाव येथील हानमंत गोविंद मोरे पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात हिमायतनगर तालुक्यातील वडगाव जता येथील भागाजी जाधव तर देगलूर तालुक्यातील टाकळी येथील रामदास मलागर या दोघांचा १७ ऑगस्ट रोजी पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला.
तर मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील चंद्रकांत बोधणे यांचाही पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. मुखेड तालुक्यातीलच माधव डोरनाळे हा ३३ वर्षीय तरुण २८ सप्टेंबर रोजी मृत्युमुखी पडला. तर ११ ऑक्टोबर रोजी किनवट तालुक्यातील खांबाळा येथील सचिन चव्हाण या २३ वर्षीय तरुणाचा पुराच्या पाण्याने जीव घेतला.
पुराप्रमाणेच जिल्ह्यात सात जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. यामध्ये कंधार तालुक्यातील हरबळ येथील २६ वर्षीय महिला हिमायतनगर तालुक्यातील सरसरम येथील ५० वर्षीय पुरुष, किनवट तालुक्यातील निचपुर येथील ३५ वर्षीय पुरुष, कंधार तालुक्यातील गौळ येथील ५० वर्षीय पुरुष, बिलोली तालुक्यातील लघुळ येथील १६ वर्षीय तरुण आणि कंधार तालुक्यातील औराळ येथील एका पुरुषाचा ११ ऑक्टोबर रोजी अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला.
जिल्ह्यात १३८ जनावरांचाही घेतला बळी
पशुसंवर्धन विभागाने ६० हजार जनावरांचे लसीकरण केल्याने लंपी स्कीन आजार काहीसा नियंत्रणात आला. दुसरीकडे पावसाळ्यात जिल्ह्यात तब्बल १३६ जनावरे मृत्युमुखी पडली असून, यात सर्वाधिक ३३ जनावरे मुखेड तालुक्यातील आहेत. तर कंधार ३४, लोहा तालुका २१, उमरी आणि नांदेड तालुक्यात प्रत्येक ७, धर्माबाद ९, देगलूर ६, अर्धापूर, किनवट आणि मुदखेड तालुक्यात प्रत्येकी ३, बिलोली २, तर भोकर, नायगाव, हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात प्रत्येकी एका जनावराचा पाण्यात वाहून जावून तसेच विजा कोसळून मृत्यू झाला आहे.