होय, नाते पुन्हा फुलू शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:14 AM2018-02-08T00:14:41+5:302018-02-08T00:15:04+5:30
द्वेष चुकीचा आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी दोघातील विसंवादाची पोकळी भरून निघाली पाहिजे. दुभंगलेल्या कुटुंबातील बाप आणि मुलगी एका वळणावर समोरासमोर येतात. आणि गैरसमज दूर होऊन मुलगी आणि वडिलांच्या नात्यातील पोकळी भरुन निघते. नाते पुन्हा फुलू शकते हाच निर्मळ संदेश बुधवारी ‘नथिंग टू से’ नाटकाने दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : द्वेष चुकीचा आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी दोघातील विसंवादाची पोकळी भरून निघाली पाहिजे. दुभंगलेल्या कुटुंबातील बाप आणि मुलगी एका वळणावर समोरासमोर येतात. आणि गैरसमज दूर होऊन मुलगी आणि वडिलांच्या नात्यातील पोकळी भरुन निघते. नाते पुन्हा फुलू शकते हाच निर्मळ संदेश बुधवारी ‘नथिंग टू से’ नाटकाने दिला.
हौशी राज्य नाट्यस्पर्धेच्या चौथ्या दिवशी कुसुम सभागृहात दुपारी चार वाजता निष्पाप कला निकेतन, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने प्रसाद दानी लिखित प्रताप सोनाळे दिग्दर्शित ‘नथिंग टू से’ या नाट्यप्रयोगाचे सादारीकरण झाले. बाप आणि मुलगी याचं नातं अगदी तरल.
बाबा मुलीला बोटाला धरून चालविण्यापासून ते लग्नापर्यंत साथ, आधार देतात, मुलीला वडिलांकडून मिळणारे प्रेम, शिकवण, रडणं , हसणं आणि स्पर्श यातून नात फुलत जातं; पण काही मुलांच्या बाबतीत वडिलांकडून ही संधी मिळत नाही. त्यामुळे नातं असूनही अंतर पडते. आणि नात्यामध्ये पोकळी निर्माण होते. आईवडिलांचा घटस्फोट, मूल आईकडं जातं, वडिलांना पोरकं होतं. मुलाच्या मनात भावनिक पोकळी निर्माण होते. आणि वडील मुलाचं नातं दुरावत एकमेकांविषयी समज-गैरसमज निर्माण होतात आणि कारण न जाणताच एकमेकांविषयी द्वेष निर्माण होतो.
बाप आणि मुलगी नात्यातील माणूस व नातं समजून घेता येणे म्हणजेच नथिंग टू से... तीन पात्र असलेल्या या नाटकात संतोष अबाळे, तनुजा मिराशी, प्रकाश रावळ यांनी उत्तम भूमिका साकारली तर नेपथ्य- विनय शिंदे, पार्श्वसंगीत- सलमान मोमीन, प्रकाशयोजना- प्रताप सोनाळे, वेशभूषा- आनंद दमणगे, रंगभूषा- सुनीता वर्मा यांनी साकारली.
‘समीकरण’ने दिला नाते शिकविणारा नाट्यानुभव
अशाच मुली आणि वडिलांच्या भावविश्वावर आधारित नाट्यानुभव घेता आला ते समीकरण या नाटकातून. मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेच्या वतीने सादर झालेले नेहा चासकर लिखित, अदिती द्रविड दिग्दर्शित समीकरण हे नाटक नात्यातील समीकरण शिकवून जाते. पॅरीलीसने आजारी पडलेले वडील शास्त्रज्ञ वडील ( अंबर गणपुले )आणि त्यांची छोटी मुलगी आभा ( मानसी भवाळकर ) आणि मोठी मुलगी शर्वरी (शिवानी दामले ) या तिघांवर आधारित ही कथा प्रेक्षकांचे डोळे पाणावते. यात छोटी मुलगी आभा हिचा संघर्ष या नाटकातून दिसतो. या नाटकातील डॉक्टर (अमोघ वैद्य) , सारंग ( नितीश सप्रे ) यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. मानसी भवाळ यांनी आपल्या अभिनयाने बाजी मारली तर अंबर गणपुले याने आपल्या वडिलांच्या भूमिकेने रसिकांची मने जिंकली.