अवघ्या दहा गुंठे जमिनीतून हिरव्या मिरचीचे १ लाखाचे उत्पन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:30 AM2018-11-01T11:30:29+5:302018-11-01T11:32:13+5:30

यशकथा : व्यवहारे यांनी अवघ्या पाच महिन्यांत मिरचीमधून १ लाखांचे उत्पन्न काढले.

The yield of green chilli 1 lakhs from just ten tenement land | अवघ्या दहा गुंठे जमिनीतून हिरव्या मिरचीचे १ लाखाचे उत्पन्न 

अवघ्या दहा गुंठे जमिनीतून हिरव्या मिरचीचे १ लाखाचे उत्पन्न 

googlenewsNext

- डॉ. गंगाधर तोगरे (कंधार, जि. नांदेड)

कंधार बोरी बु. (ता.कंधार) येथील व्यवहारे कुटुंबाने १० गुंठे साधारण प्रकारच्या जमिनीवर हिरवी मिरची लागवड केली. अपार कष्ट, योग्य नियोजन व देखभाल करीत मारोती खंडू व्यवहारे, पारूबाई मारोती व्यवहारे, उत्तम मारोती व्यवहारे, रमाबाई उत्तम व्यवहारे यांनी अवघ्या पाच महिन्यांत १ लाखांचे उत्पन्न काढले. त्यांचा शेतीतला हा प्रयोग पाहण्यासाठी आता शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. 

कंधार तालुका श्रमिक, जिद्दी म्हणून परिचित आहे. सिंचन प्रमाण अत्यल्प आहे. निसर्ग पावसावर शेतीचे भवितव्य आहे. सिंचनासाठी असलेले प्रकल्प, तलाव पर्जन्यमान घटल्याने तळाला जात आहेत. प्रसंगी कोरडे पडत असल्याने शेतीचे अर्थकारण बिघडत असताना नाउमेद न होता काळ्या आईवर विसंबून राहणारे शेतकरी आपली जिद्द कायम ठेवत आहेत. अशा शेतकऱ्यांत व्यवहारे कुटुंबाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

बारूळ मानार प्रकल्पालगत गाव व शेती असल्याने बोरी बु. गावकऱ्यांना शेती फुलविण्यासाठी लाभ होतो. व्यवहारे कुटुंबाने १० गुंठे साधारण जमिनीवर मिरची लागवडीचा संकल्प केला. त्यासाठी लागवडपूर्व योग्य मशागत केली. सानिया, ज्वाला, ससा या मिरचीची १० हजार रोपे लावली. शेणखत व रासायनिक खतांची योग्य मात्रा दिली. मिरची दिवसागणिक फुलू लागली. सुमारे अडीच फुटापर्यंत रोपट्याची वाढ झाली. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लिंबोळी अर्क व गोमूत्र फवारणी केली.

एका वर्षाचे मिरची पीक असल्याने काळजी अधिक घ्यावी लागते. ती घेताना कोणतीही कसर ठेवली नाही. मिरचीला पाटाद्वारे पाणी देण्याची पद्धत उपयोगात आणली.  लागवड, खत, निंदणी, फवारणी, तोडणी आदीवर सुमारे २० ते २५ हजार खर्च झाला. मिरचीने रोपटे बहरले अन् तोडणी करीत कंधार, मुखेड, लोहा, जळकोट, कुरुळा, नायगाव आदी आठवडी बाजारात मिरची विक्री होऊ लागली. मिरचीला बाजारात आजघडीला भाव बरा आहे. प्रतिकिलो ४० ते ५० भाव असल्याने केलेल्या मेहनतीला फळ येत आहे. मे महिन्यात लागवड केलेल्या मिरचीचे पाच महिन्यांत एक लाख उत्पन्न मिळाल्याचे प्रभाकर व्यवहारे यांनी सांगितले.

अद्याप सहा महिन्यांपेक्षा अधिक मिरचीचा हंगाम शिल्लक आहे. त्यामुळे आणखी मोठे उत्पादन मिळण्याची अपेक्षा व्यवहारे  यांनी व्यक्त केली. शेतीत नवनवीन पीक प्रयोग करण्यात ते सतत अग्रेसर असतात. मिरची लागवडीचा प्रयोग करीत त्यांनी यश मिळविल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांत कौतुक होत आहे. त्यांनी शेतीत केलेला हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरला आहे.

Web Title: The yield of green chilli 1 lakhs from just ten tenement land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.