मारहाणीमुळेच योगेशचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:33 AM2018-01-22T00:33:44+5:302018-01-22T00:34:36+5:30
हदगाव तालुक्यातील आष्टी येथे पोलीस लाठीहल्ल्यात मृत्यू पावलेल्या योगेश जाधव याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले़
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : हदगाव तालुक्यातील आष्टी येथे पोलीस लाठीहल्ल्यात मृत्यू पावलेल्या योगेश जाधव याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले़
कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंददरम्यान हदगाव तालुक्यातील आष्टी येथे लाठीहल्ल्याची घटना घडली होती़ रविवारी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आष्टी येथे जावून योगेशच्या कुटुंबियांची भेट घेतली़ योगेशच्या कुटुंबियांना आपल्या पक्षाकडून पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा आठवले यांनी केली़ तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही ते म्हणाले़ योगेशचा धावताना त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता कमी आहे़ जबर मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला़ योगेशचे कुटुंबीय गरीब आहेत़ त्यामुळे दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेतून या कुटुंबाला जिल्हाधिकाºयांनी जमीन मिळवून द्यावी, कुटुंबियांना शेतजमीन, घरकुल देण्याचे प्रयत्न आपण करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने योगेश जाधवच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर करताना दोन लाख रुपये रोख दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, तहसीलदार संदीप कुलकर्णी, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, गौतम भालेराव,बाबूराव कदम, विजय सोनवणे, गौतम काळे, मिलिंद शिराढोणकर आदी उपस्थित होते.
योगेशच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करुन दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.