स्वस्तधान्य दुकानावर उडीद डाळही मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:53 AM2018-10-26T00:53:41+5:302018-10-26T00:54:03+5:30
अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना अनुदानीत दराने स्वस्तधान्य दुकानावर आता चणा डाळीसह उडीद डाळही मिळणार आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील तहसीलदारांकडून डाळीची मागणी नोंदविण्यात येत आहे.
अनुराग पोवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना अनुदानीत दराने स्वस्तधान्य दुकानावर आता चणा डाळीसह उडीद डाळही मिळणार आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील तहसीलदारांकडून डाळीची मागणी नोंदविण्यात येत आहे.
नाफेडने विहित केलेल्या गोदामामधून चणा व उडीदाची उचल करणे, भरडई करणे, भरडई अंती प्राप्त झालेली डाळ एक किलोच्या पाकिटामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही डाळ रास्तभाव दुकानामार्फत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना अनुदानीत दराने विक्री करायची आहे. याबाबत शासन निर्णय पुरवठा विभागाला कळविण्यात आला आहे.
स्वस्तधान्य दुकानावर चणा आणि उडीद डाळ या ३५ रुपये प्रति किलोदराने उपलब्ध होणार आहे. सदर चणा डाळ व उडीदाच्या वितरणापोटी दुकानदारांना प्रतिकिलो दीड रुपयाची मार्जिन मिळणार आहे.
शासनाकडून चणा व उडीद डाळीच्या २५ पाकिटाची एक बॅग उपलब्ध करुन दिली जाणार आहे. चणा डाळ व उडीद डाळ विहित ठिकाणी प्राप्त होताना त्या त्या ठिकाणच्या जिल्हा पुरवठा विभागातील प्रतिनिधींची उपस्थिती आवश्यक करण्यात आली आहे.
चणा डाळीचे वितरण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातही चणा व उडीद डाळीची नोंदणी पुरवठा विभाग करीत आहे. त्या-त्या तहसीलदारांकडून शिधापत्रिकाच्या संख्येनुसार नोंदणी मागविण्यात येत आहे. नोंदणी प्राप्त झाल्यानंतर शासन डाळी उपलब्ध करुन देणार आहे.
दिवाळीसाठी विशेष धान्य कोटा नाही
वर्षातील सर्वात मोठा सण हा दिवाळी मानला जातो. यापूर्वी दिवाळी सणानिमित्त स्वस्तधान्य दुकानावर शिधापत्रिका धारकांनी जादा साखर, इतर धान्य उपलब्ध करुन दिले जात होते. मागील दोन वर्षापासून मात्र दिवाळी अथवा कोणत्याही सणानिमित्त जादा धान्य उपलब्ध करुन दिले जात नाही. आहे त्या धान्याचे नियतनही आता कमी होत चालले आहे.