तुमचे ५० खोके अन् आमचे १०५ डोके; बॅनरबाजीतून फडणवीस समर्थकांचा शिंदे सेनेवर निशाना
By शिवराज बिचेवार | Published: June 16, 2023 05:52 PM2023-06-16T17:52:58+5:302023-06-16T17:53:23+5:30
या बॅनरनंतर शिंदे गट आता काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नांदेड : राज्यात शिंदे सेना आणि भाजपात सर्व काही आलबेल नाही हे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या एका जाहिरातीतून दिसून आले. त्यानंतर राज्यभरात शिंदे आणि फडणवीस समर्थकांनी बॅनरबाजी करून एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले हाेते. त्यातून दोघांमध्ये वितुष्ट वाढतच गेले. त्यावर गुरुवारी दोघांनीही सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. परंतु हा वाद आता वाढतच गेला असून, त्याचे पडसाद शुक्रवारी नांदेडातही उमटले. आयटीआय चौकात देवेंद्र फडणवीस समर्थकांनी ५० खोके आणि १०५ डोके अशा आशयाचे बॅनर लावले. त्यात चाणक्यचा फोटो आणि शेजारी पन्नास डोकी वापरण्यात आला. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी घरोबा केला. शिंदे गटाच्या पन्नास आमदारांचा सत्तेत सहभाग आहे. नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली, तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. तेव्हापासूनच भाजपचे आमदार आणि समर्थकांमध्ये नाराजी आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शिंदे समर्थकांनी माध्यमांमध्ये एका सर्वेक्षणाची जाहिरात दिली. त्यानुसार राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता अधिक असल्याचे आकडे छापण्यात आले.
तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या छायाचित्राचाही विसर पडल्याची टीका त्यानंतर झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सारवासारव करण्यासाठी पुन्हा जाहिरात देण्यात आली. त्यात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या फोटोसह शिंदे गटाच्या मंत्र्यांचे छायाचित्र छापण्यात आले. तसेच आकडेवारीचाही उल्लेख केला नव्हता. परंतु या दोन्ही दिवसांच्या जाहिरातीत शिंदे राज्यात आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली होती.
भाजप समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत राज्यातील अनेक शहरात बॅनरबाजीही केली होती. त्यातच फडणवीस यांनी शिंदे यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थितीही टाळली होती.
परंतु गुरुवारी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मात्र शिंदे आणि फडणवीस एकाच हेलिकॉप्टरने कार्यक्रमस्थळी पोहोचले. दोघांचाही व्यासपीठावर वावर सहज होता. भाषणातही एकमेकांचा त्यांनी लोकप्रिय असा उल्लेख केला, तर शिंदे यांनी येे फेव्हिकाॅल का जोड है तुटेगा नही, अशी डायलॉगबाजी केली. त्यामुळे या वादावर पडदा पडल्याचे दिसून येत होते. परंतु शुक्रवारी आयटीआय चौकात फडणवीस समर्थकांनी ५० खोके आणि १०५ डोके अशा आशयाचे बॅनर लावले. त्यावर चाणक्य आणि पन्नास डोकी तसेच खाेक्यांचे छायाचित्र वापरण्यात आले. त्यामुळे हा वाद आता आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. या बॅनरनंतर शिंदे गट आता काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.