कर्ज परतफेडीच्या तगाद्याने युवकाची आत्महत्या; माजी आमदार पुत्रासह ९ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 06:18 PM2021-08-10T18:18:32+5:302021-08-10T18:22:26+5:30
Crime News Nanded : ययाती मुंडे यांनी अनेक जणांकडून जवळपास ६५ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले हाेते.
नांदेड : पैशाच्या परतफेडीसाठी तगादा सुरू असल्याने युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी माजी आमदार पोकर्णा यांच्या पुत्रासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ( Crime against 9 persons including former MLA Omprakash Pokarna's son )
ययाती प्रभाकर मुंडे असे मयताचे नाव आहे. त्यांनी काही जणांकडून पैसे घेतले होते. परंतु वेळेवर त्याची परतफेड करू शकले नाही. त्यामुळे देणेकऱ्यांनी पैसे परतफेडीसाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता. त्याला कंटाळून ययाती यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात ज्योती मुंडे यांच्या तक्रारीवरून गुरुमितसिंग टुटेजा, करमजितसिंघ बेदी, करमजितसिंघ कारला, किशनजितसिंघ, प्रेमजितसिंघ टेलर, जितेंद्र सूरनर, माधव कदम, संजय जोगदंड आणि प्रवीण ओमप्रकाश पोकर्णा यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला. ययाती मुंडे यांनी अनेक जणांकडून जवळपास ६५ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले हाेते. परंतू या कर्जाची आणि व्याजाची परतफेड ते करु शकले नाहीत. या प्रकरणात पोलिसांकडून झालेल्या व्यवहाराची तपासणी करण्यात येत आहे.
संपत्ती विकूनही व्याज देणे झाले नाही
ययाती मुंडे यांच्यावर नऊ लोकांचे तब्बल ६५ लाख रुपये देणे होते. या रक्कमेपोटी त्यांनी श्रीनगरमधील दोन दुकाने आणि पहिल्या मजल्यावरील हॉल विकून कर्जफेड केली होती. परंतू त्यानंतरही कर्ज आणि व्याजाची रक्कम देणे त्यांच्याने झाले नाही. त्यामुळे देणेकऱ्यांनी पैशासाठी तगादा लावला होता. अशी चिठ्ठी मुंडे यांनी लिहून ठेवली होती.त्यात करमजीतसिंग बेदी ६ लाख, किशनसिंग ८ लाख, करमजीतसिंग कालरा ७ लाख, प्रेमजीतसिंग टेलर ८ लाख, संजय जोगदंड ८ लाख, जितेंद्र सुरनर ३ लाख, माधव कदम ८ लाख आणि प्रवीण ओमप्रकाश पोकर्णा यांचे साडे दहा लाख रुपये देणे असल्याचे चिठ्ठीत नमूद करण्यात आले हाेते.
दोन वर्षापूर्वी काढले होते कर्ज
ययाती मुंडे यांची पत्नी ज्योती मुंडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांच्या पतीने दोन वर्षापूर्वी कर्ज घेतल्याचे नमूद आहे. घटनेच्या दिवशी चहा घेतल्यानंतर जप करतो म्हणून ते खोलीत गेले हाेते. सकाळी साडे दहा वाजता दार ठोठावल्यानंतर आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर सासू आल्या, त्यांच्या मदतीने दरवाजा तोडल्यावर समोर ययाती यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.