चिमणी संवर्धनासाठी युवकांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:17 AM2021-03-21T04:17:21+5:302021-03-21T04:17:21+5:30
ग्रामीण भागात दिवसेंदिवस होणाऱ्या बदलामुळे अंगणात बागडणाऱ्या चिऊताईची संख्या आता कमी होतानाचे चित्र आहे. ग्रामीण बाल मनावर चिमणी पक्षाचे ...
ग्रामीण भागात दिवसेंदिवस होणाऱ्या बदलामुळे अंगणात बागडणाऱ्या चिऊताईची संख्या आता कमी होतानाचे चित्र आहे. ग्रामीण बाल मनावर चिमणी पक्षाचे जिवंत आणि सजीव चित्रण आता दुर्मिळ होत असून ‘चिऊ चिऊ ये, चारा खा... पाणी पी... आणि भुर्रर्र उडून जा’. ग्रामीण भागातील बाल मनाचा ठाव घेणारी ही रचनाच आता कृत्रिम होताना पाहायला मिळते. नष्ट होणारी वनसंपदा आणि आधुनिक बांधकाम पद्धती यामुळे पूर्वी घराला असणारी चिमण्यांची घरटी आता दुरापास्त होताना दिसत आहेत. हवामानातील बदल, उष्मावृद्धी आणि तंत्रज्ञानाचा अतिरेक याचा थेट परिणाम असल्याने अंगणात होणारा चिवचिवाट आता ओसरु लागला आहे.
या जाणिवेतून व्यवसायाबरोबर नारायण पांचाळ यांनी मागील चार वर्षांपासून टाकाऊ प्लायवूडपासून चिमण्यांसाठी असंख्य कृत्रिम निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे घरट्यासाठी जागा शोधणाऱ्या चिमण्यांंना आधार मिळाला असून ऊन, वारा, पाऊस आणि इतर मोठ्या पक्षापासून त्यांचे संरक्षण होत आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या चिमण्यांना आधार व्हावा, यासाठी काळे यांनी टाकाऊ प्लास्टिक बॉटल आणि मातीची येळणीपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. ही कृत्रिम घरटी आणि प्लास्टिक कुंडी या दोघांनी जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला विविध ठिकाणी भेट देऊन जैवविविधता संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.