झीरो पोलिसाच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:47 AM2017-12-16T00:47:09+5:302017-12-16T00:47:13+5:30
दारु विक्रेत्याकडून पोलीस अधिका-याच्या नावे सहा लाख रुपयांची खंडणी उकळणा-या मसरत आलम ऊर्फ मुन्ना याच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ शुक्रवारी वजिराबाद पोलिसांनी मुन्नाला न्यायालयात हजर केले होते़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दारु विक्रेत्याकडून पोलीस अधिका-याच्या नावे सहा लाख रुपयांची खंडणी उकळणा-या मसरत आलम ऊर्फ मुन्ना याच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ शुक्रवारी वजिराबाद पोलिसांनी मुन्नाला न्यायालयात हजर केले होते़
तामसा येथील मसरत आलम ऊर्फ मुन्ना हा स्थानिक गुन्हे शाखेत अनेक वर्षे झीरो पोलीस म्हणून कार्यरत होता़ नोकरीचे आमिष दाखवून एका जणाला गंडविल्याच्या प्रकरणात त्याच्यावर हदगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ त्यानंतर मुन्नाने नांदेड शहरातील एका दारु विक्रेत्याची गाडी अडवून सपोनि ओमकांत चिंचोलकर यांच्या नावे सहा लाख रुपयांची खंडणी उकळली होती़ याप्रकरणी दारु विक्रेत्याने वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ त्यानंतर वजिराबाद पोलिसांनी हदगाव पोलिसांकडून मुन्नाला ताब्यात घेवून त्याला न्यायालयात हजर केले होते़ न्यायालयाने त्याला यापूर्वी १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ त्यानंतर शुक्रवारी पुन्हा मुन्नाला न्यायालयात हजर करण्यात आले़ न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आता सोमवारपर्यंत वाढ केली आहे़ दरम्यान, मुन्नाच्या चौकशीत आणखी कुणाची नावे समोर आली हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़