जिल्हा परिषद चकाचक
By admin | Published: November 5, 2014 01:28 PM2014-11-05T13:28:16+5:302014-11-05T13:28:16+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंगळवारी जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.
Next
नांदेड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंगळवारी जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, कक्षाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. वर्षानुवर्षे साचलेली धूळ या मोहिमेत दूर केल्यानंतर जिल्हा परिषद अगदी चकाचक झाली होती.
स्वच्छतेचे महत्व ग्रामीण भागात पटवून देत असताना ज्या कार्यालयात आपण काम करतो ती कार्यालय स्वच्छ आणि प्रसन्न असावीत या हेतूने मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी ही मोहीम राबविली. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच जिल्हा परिषदेतल्या सर्व विभागाच्या अधिकार्यांनी हाती झाडू घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी आपल्या कक्षातील धूळ स्वत:च दूर केली.
इतकेच नव्हे, तर जि.प. तरंगलेले कोपरेही त्यांनी स्वच्छ केले. त्यांच्यासह सर्वच खातेप्रमुखांनी आपल्या विभागात साचलेली धूळ स्वच्छ करताना जुन्या संचिका, कचरा दूर केला. इतकेच नव्हे तर सर्व शिक्षा अभियान विभागातील कर्मचार्यांनी आपले कार्यालय चक्क धुवूनच काढले. मोहर्रमची सुटी असतानाही अधिकारी कर्मचार्यांनी स्वच्छतेप्रती दाखविलेला उत्साह निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे. या मोहिमेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दुर्गादास रोडे, कार्यकारी अभियंता एस. पी. पैलवाड, एन. एम. नलावडे यांच्यासह सामान्य प्रशासन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, वित्त विभाग, पंचायत विभागातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. मोठय़ा प्रमाणात कार्यालयातच साचलेली धूळ विभागप्रमुखांसह सर्वांच्याच डोळ्याआड राहत होती. मात्र या मोहिमेमुळे मोठय़ा प्रमाणात ती दूर झाली. जिल्हा परिषद परिसरातही स्वच्छता करण्यात आली. आरोग्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम उपयुक्त ठरला आहे.
स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात काम करण्यासाठी दर मंगळवारी श्रमदानातून जि. प. च्या सर्व कार्यालयात आणि परिसरात स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरही दर मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल, असे काळे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे आता पंचायत समितीस्तरावरही हा उपक्रम राबविण्याची तयारी सुरू झाली आहे.