जिल्हा परिषदेने सुरू केली १६०४ गावांत लसीकरण जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:38+5:302021-06-25T04:14:38+5:30
कोरोनावर लस हाच उपचार ठरत आहे. परिणामी, लसीकरणाला वेग येणे आवश्यक आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता ग्रामीण ...
कोरोनावर लस हाच उपचार ठरत आहे. परिणामी, लसीकरणाला वेग येणे आवश्यक आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता ग्रामीण भागातही लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, उपाध्यक्ष पद्मा सतपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने चित्ररथाद्वारे जनजागृती केली जात आहे. १,६०४ गावांमध्ये हे चित्ररथ लसीकरणाचे महत्त्व सांगणार आहेत. ऑडिओ संदेश, प्रसिद्धीपत्रक तसेच सर्व धर्मगुरूंचे लसीकरणाबाबतचे संदेश सांगितले जात आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी ग्रामीण भागात या जनजागृती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्या गावात जनजागृती केली जात आहे तेथील सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांनाही मोहिमेत सहभागी करून घेतले जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले.
चाैकट - जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे अभिनंदन
जिल्ह्यात कोरोना काळात आरोग्य विभागाने केलेल्या कार्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांचा बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. कोरोनाची दुसरी लाट चिंताजनक होती. या काळात आरोग्य विभागाने गतिमान उपाययोजना करीत ही लाट ग्रामीण भागात कमी करण्यात यश मिळवले आहे. जि.प. सदस्य मनोहर शिंदे यांनी मांडलेल्या या ठरावास साहेबराव धनगे, प्रकाश भोसीकर, समाधान जाधव, प्रवीण पाटील चिखलीकर आदींनी अभिनंदन करीत अनुमोदन दिले.