जिल्हा परिषदेचे सावित्रीबाई फुले व नरहर कुरुंदकर पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:18 AM2021-01-25T04:18:22+5:302021-01-25T04:18:22+5:30
नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने दिले जाणारे सावित्रीबाई फुले पुरस्कार व कै.नरहर कुरुंदकर पुरस्कारांची घोषणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ...
नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने दिले जाणारे सावित्रीबाई फुले पुरस्कार व कै.नरहर कुरुंदकर पुरस्कारांची घोषणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, शिक्षण समितीचे सभापती संजय बेळगे व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली आहे.
सन २०१९ व २०२० या दोन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता या पुरस्काराचे वितरण कुसुम सभागृहात समारंभपूर्वक होणार आहे.
नांदेड जिल्हा परिषद ही विकासात्मक कामाशिवाय सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील अत्युच्च योगदान असणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी सावित्रीबाई फुले पुरस्कार व कै.नरहर कुरुंदकर पुरस्काराने सन्मानित करत असते. शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने दिला जाणारा सन २०१९चा सावित्रीबाई फुले पुरस्कार बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या बारगजे यांना, तर सन २०२०चा सावित्रीबाई फुले पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या बेबी सुरेखा शिंदे रावणगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
तसेच २०१९ या वर्षाचा नरहर कुरुंदकर पुरस्कार ज्येष्ठ लेखक, कवी डॉ.सुरेश सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे, तर सन-२०२०चा कै.नरहर कुरुंदकर पुरस्कार कवयित्री लेखिका आशा पैठणे यांना जाहीर झाला आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खा.प्रताप पाटील चिखलीकर, खा.हेमंत पाटील, खा.सुधाकर शृंगारे, महापौर मोहिनी येवनकर, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, आ.विक्रम काळे, आ.अमरनाथ राजूरकर, आ.सतीश चव्हाण, आ.राम पाटील रातोळीकर, आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.रावसाहेब अंतापूरकर, आ.भीमराव केराम, आ.डॉ.तुषार राठोड, आ.श्यामसुंदर शिंदे, आ.मोहनराव हंबर्डे, आ.बालाजी कल्याणकर, आ.राजेश पवार, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, जि.प. उपाध्यक्षा पद्मा रेड्डी सतपलवार, शिक्षण सभापती संजय माधवराव बेळगे, कृषी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, समाजकल्याण सभापती अॅड.रामराव नाईक, महिला व बालकल्याण सभापती सुशीलाताई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची उपस्थिती राहणार आहे.