हिंगोली जि.प. ‘बांधकाम’ ची कामे रेंगाळलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 01:11 AM2019-07-04T01:11:06+5:302019-07-04T01:11:31+5:30
येथील जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या कामांकडेच बहुदा प्रशासनाचे दुर्लक्ष असते. पदाधिकाऱ्यांची दालने वर्षभरातच दुरुस्तीला आली आहेत. विशेष म्हणजे लिफ्टचे कामही थांबलेले आहे.
हिंगोली : येथील जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या कामांकडेच बहुदा प्रशासनाचे दुर्लक्ष असते. पदाधिकाऱ्यांची दालने वर्षभरातच दुरुस्तीला आली आहेत. विशेष म्हणजे लिफ्टचे कामही थांबलेले आहे. फर्निचरच्या कामावरुन बोंब होत असून प्रवेशद्वारात टाकलेल्या फरशीवर पाणी साचत आहे.
हिंगोली जि.प.च्या बांधकाम विभागाची अनागोंदी कायम समोर येत असते. जि.प.तील अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दालनाची कामे तर दरवर्षीच करावी लागतात. यावरून बाहेरच्या कामांच्या दर्जाची तुलना करता येईल. या विभागातील अधिकाºयांचे कामाकडे लक्ष असते की नाही, याची शंका घ्यावी इतपत प्रकार समोर येतात. मध्यंतरी तर कामाच्या दर्जावरून अनेक तक्रारी येत होत्या. वसमतच्या उपअभियंत्याची तर वेगळीच तक्रार सीईओंपर्यंत जाऊनही काहीच झाले नाही. परिणामी, बांधकाम विभागाचे मनोबल वाढत आहे. गेल्यावर्षीच पदाधिकाºयांच्या दालनाची कामे झाली असताना पार्टीशन उखळले असून पीओपी गळू लागली आहे. लिफ्टचे काम अनेक महिन्यांपासून सुरूच आहे. ग्रीननेट टाकून ते झाकले असले तरीही जास्त दिवस हे काम असेच राहिले तर अपघाताचा धोकाही नाकारता येत नाही. प्रवेशद्वारावर फरशी तर टाकली. मात्र आता तेथेच पावसाचे पाणी साचत आहे. स्वच्छतागृहांचे बेहाल कायम आहेत. काही स्वच्छतागृहे बंदच आहेत. कुठे पाणी आहे तर गळतीची समस्या आहे तर कुठे पाणीच नाही. एकेका विभागात आता कर्मचाºयांसाठी फर्निचरची व्यवस्था केली जात आहे. मात्र त्यात सोयी कमी अन् गैरसोयीच जास्त असल्याची कर्मचाºयांचीच बोंब आहे. अभियंता मंडळी गुत्तेदारासाठी डिझाईन बनविते की, कर्मचाºयांच्या सोयीसाठी, असा सवाल केला जात आहे.