झेडपी शाळेतील वर्गखोलीचा स्लॅब कोसळला; अंगणवाडी ताई जखमी, विद्यार्थी थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 01:37 PM2024-10-01T13:37:44+5:302024-10-01T13:39:28+5:30
ही वर्गखोली वापरण्यास योग्य नसल्याने शाळेचे विद्यार्थी येथे बसविले जात नव्हते. मात्र, येथेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना का बसविण्यात आले?
हदगाव: राजवाडी येथिल जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या वर्गखोलीत अंगणवाडी भरते. सोमवारी ( दि. ३०) सकाळी अंगणवाडी सुरू असताना अचानक वर्ग खोलीचा स्लॅब अंगणवाडी ताईच्या डोक्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. अंगणवाडी ताई यात जखमी झाल्या असून नशीब बलवत्तर म्हणून समोर बसलेले चिमुकले थोडक्यात बचावले.
राजवाडी हे हदगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाचे गाव असून लोकसंख्या ८९२ इतकी आहे. येथे पाचवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा असून याच इमारतीमध्ये मागील काही दिवसांपासून अंगणवाडी देखील एका जुन्या वर्गखोलीत भरते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंगणवाडीताई आणि १० विद्यार्थी जुन्या वर्गखोलीत उपस्थित होते. अंगणवाडी ताई कमल शिरगीरे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माहितीवर काम करत होत्या. यावेळी अचानक खोलीचा स्लॅब कोसळून अंगणवाडी ताईच्या डोक्यावर कोसळला. यामध्ये त्या जखमी झाल्या. तर समोर बसलेले विद्यार्थी थोडक्यात बचावले. त्यांना उपचारासाठी तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
यापूर्वी ही अंगणवाडी गावातील एका मंदिरात भरविली जात असे. परंतु एक वर्षापासून जिल्हा परिषद शाळेतील एका जुन्या वर्गखोलीत भरवणे सुरू झाले. ही वर्गखोली वापरण्यास योग्य नसल्याने शाळेचे विद्यार्थी येथे बसविले जात नव्हते. मात्र, येथेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना का बसविण्यात आले असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.
अंगणवाडी व्हरांड्यातच भरवली जाते
वर्गखोली जास्त जुनी नाही. अंगणवाडी व्हरांड्यातच भरवली जाते. मात्र, पाऊस आला तरच वर्गामध्ये विद्यार्थी बसतात. मला किरकोळ मार लागला असून सर्व विद्यार्थीवर सुरक्षित आहेत.
- कमल शिरगीरे, अंगणवाडी
नवीन इमारतीचा प्रस्ताव प्रलंबित
अंगणवाडी इमारतीसाठी ग्रामपंचायतने अनेकदा संबंधित विभागाला ठराव दिला आहे. परंतु अद्याप मंजुरी मिळाली नाही.
- साईनाथ फुलारी, सरपंच, राजवाडी