32 पैकी 10 सरपंच निवड बिनविरोध : शहादा तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:59 AM2018-09-17T11:59:44+5:302018-09-17T11:59:55+5:30
सदस्यांच्या 123 जागांसाठी 398 उमेदवार रिंगणात
शहादा : तालुक्यात 32 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून नामनिर्देशन अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसअखेर 32 पैकी 10 ग्रा.पं.चे सरपंच बिनविरोध झाले आहेत. उर्वरित 22 जागांसाठी 73 उमेदवार रिंगणार आहेत. 266 ग्रा.पं. सदस्यांच्या जागांपैकी 124 सदस्य बिनविरोध तर 19 जागांसाठी नामनिर्देशन अजर्च दाखल झालेले नाहीत. उर्वरित 123 जागांसाठी 398 उमेदवार रिंगणात आहेत. नऊ ग्रा.पं.च्या सदस्यांच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत.
तालुक्यात जनतेतून थेट सरपंच निवडणूक प्रथमच होत आहे. 32 ग्रा.पं.ची निवडणूक प्रक्रिया सुरू असून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. माघारीनंतर या ग्रा.पं. निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत लांबोळा, करजई, तितरी, सावळदा, वाघर्डे, वाघोदा, कमरावद, उजळोद, पिंप्री व नवानगर या 10 ठिकाणची सरपंच निवड बिनविरोध झाली आहे. उर्वरित 22 जागांसाठी 73 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच करजई, तितरी, वाघर्डे, वाघोदा, कमरावद, उजळोद, नवानगर, पिंप्री, लांबोळा याठिकाणच्या सदस्यपदाच्या सर्व जागाही बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्यात 32 ग्रा.पं.च्या 266 जागांपैकी 124 जागा बिनविरोध झाल्या तर 19 जागांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल न झालेले नाहीत. त्यामुळे सदस्यपदाच्या उर्वरित 123 जागांसाठी 398 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 26 सप्टेंबरला मतदान होणार असून 27 सप्टेंबर रोजी शहरातील तैलिक मंगल कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार मनोज खैरनार हे काम पाहत असून त्यांना नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, किशोर भानदुर्गे, किशोर महाजन हे सहकार्य करीत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या ग्रामपंचायत निवडणुकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ही निवडणूक म्हणजे जि.प. निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे.
सातपुडा साखर कारखान्याकडून उसाला 2200 दर निश्चित
सर्वसाधारण सभा : गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसाचा भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गाळप हंगाम 2017-18 साठी जाहीर केलेला ऊस दर एफआरपीपेक्षा अधिक असल्याने शेतकरी व कारखान्याचे हित जोपासण्यासाठी प्रतीटन दोन हजार 200 रुपये दिलेला भाव देण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
साखरेचे भाव खूपच खाली आल्याने साखर कारखान्यांना एफआरपी देणेही शक्य झाले नाही. ऊस गाळप करणे परवडत नसल्याने अनेक कारखान्यांनी हंगाम संपण्यापूर्वीच ऊस गाळप बंद केले होते. मात्र सातपुडा साखर कारखान्याने हंगाम 2017-18 मध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप केला. सुरुवातीला पहिला हप्ता म्हणून नोंद उसाला 2100 रुपये प्रतीटन अदा केला आहे तर संचालक मंडळाच्या निर्णयानुसार दुसरा हप्ता आणखी प्रतीटन 100 रुपये निधी उपलब्ध झाल्यानंतर अदा करण्यात येणार आहे. तर उर्वरित तिसरा हप्ता प्रतीटन 200 रुपयांप्रमाणे जाहीर केलेला असला तरी कारखान्याचे आर्थिक पत्रकानुसार कारखान्यास जास्तीचा नऊ कोटी रुपये तोटा सहन करावा लागेल म्हणून उर्वरित 200 रुपयांचा तिसरा हप्ता देणे शक्य होणार नसल्याने हंगाम 2017-18 साठी नोंद उसासाठी अंतिम ऊस दर 2200 रुपये प्रतीटन प्रमाणे निश्चित करावा, असा ठराव चेअरमन दीपक पाटील यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण बैठकीत मांडला होता. त्यास सभासदांनी मंजुरी दिल्याने कारखान्याचा तोटा कमी करता येणे शक्य होणार आहे. एफआरपी दोन हजार 18 रुपये बसत असताना कारखान्याने 182 रुपये जादा देऊन सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.