आरती पूजनात 10 हजार भाविकांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:07 PM2019-08-28T12:07:31+5:302019-08-28T12:07:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : साक्री व चौपाळा येथील भाविकांनी चौपाळ्यापासून पायी दिंडी काढून मोरवड येथे सोमवारी रात्री गुलाम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : साक्री व चौपाळा येथील भाविकांनी चौपाळ्यापासून पायी दिंडी काढून मोरवड येथे सोमवारी रात्री गुलाम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आरती पूजन केले. यानंतर दिंडीचे विसजर्न करण्यात आले. या वेळी साधारण 10 हजार भाविक या दिंडीत सहभागी झाले होते. त्यामुळे याठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
गेल्या 50 ते 60 वर्षापासून दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी गुलाम बाबांचे अनुयायी नंदुरबार तालुक्यातील चौपाळ्यापासून पायी दिंडीने मोरवड येथे येवून बाबांच्या समाधीचे दर्शन घेत असतात. यंदाही सोमवारी या दिंडीने पायी येवून बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. ‘आप की जय’च्या जयघोषाबरोबरच भजन, रामधूनमुळे मोरवड परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
या दिंडीची सुरूवात चौपाळे, ता.नंदुरबार येथून सकाळी सात वाजेपासून करण्यात आली. चौपाळा येथेच साक्री तालुक्यातील दिंडीही सहभागी झाली होती. तेथून या दोन्ही दिंडय़ा एकत्रितपणे नंदुरबार मार्गे आली. या वेळी नंदुरबार येथील आमदार कार्यालयाजवळ आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिंडीचे स्वागत केले. यानंतर सज्जीपूर मार्गे वाकाचार रस्ता, हातोडा, तळोदा, आमलाड व मोरवड येथे रात्री बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
या वेळी समाधी स्थळी आरती पूजन करण्यात आले. यानंतर दिंडीचे विसजर्न करण्यात आले. दरम्यान हातोडा पुलाजवळ ही दिंडी आल्यानंतर माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी, आमदार विजयकुमार गावीत, आमदार के.सी. पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांनी दिंडीचे स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी दिंडीचे पूजन केले.
रूपसिंग पाडवी, यशवंत पाडवी, हिरामण पाडवी उपस्थित होते. फुलांनी सजविलेल्या रथात गुलाम बाबांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. गावात ठिकठिकाणी सुवासिनींनी दिंडीचे आरती पूजन केले. मोरवड येथे बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या मठात भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. मठपती जितेंद्र पाडवी हे चौपाळ्यापासूनच दिंडीत सहभागी झाले होते. यंदा प्रथमच साक्री तालुक्यातील दिंडी चौपाळा येथे सहभागी होऊन एकत्र आल्यामुळे या दोन्ही दिंडय़ांनी तळोदेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. यामुळे शहराची बाजारपेठदेखील फुलली होती.