जिल्ह्यात १०,७०० शिधापत्रिका वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:07 PM2020-07-19T12:07:10+5:302020-07-19T12:07:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या नवीन शिधापत्रिका वितरीत करण्याच्या विशेष मोहिमे अंतर्गत गेल्या चार महिन्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या नवीन शिधापत्रिका वितरीत करण्याच्या विशेष मोहिमे अंतर्गत गेल्या चार महिन्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत १० हजार ७६८ शिधापत्रिकांची वाढ झाली असून त्यामुळे जिल्ह्यातील ३६ हजार २३१ व्यक्तिंना अन्नधान्याचा लाभ होणार आहे.
शिधापत्रिका नसलेल्यांना त्या उपलब्ध करून देणे आणि शिधापत्रिका असलेल्यांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ देणे अशा दोन्ही पातळ्यांवर ही मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार ४,१०० नव्या शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या, तर सहा हजार ६६८ शिधापत्रिकांचा समावेश वरील दोन्ही योजनेत करण्यात आला. अंत्योदय योजनेअंतर्गत एकूण ३,७१९ शिधापत्रिकांची वाढ झाली आहे. त्यापैकी अक्कलकुवा १,७१३, अक्राणी १,०६०, शहादा १,२३१ आणि नंदुरबार तालुक्यातील २६१ आहेत. त्यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील ८,७७८, अक्राणी ४,८९७, नंदुरबार ३४६ आणि शहादा ५,५२३ व्यक्तिंना योजनेचा लाभ होणार आहे. ५४६ शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याने वाढ झालेल्या व्यक्तिंची एकूण संख्या १७ हजार ५०२ आहे. प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत एकूण ७,०४९ शिधापत्रिकांची वाढ झाली आहे. त्यापैकी अक्कलकुवा २,४५८, अक्राणी ८२, शहादा २,८९३, नवापूर १,५०३ आणि तळोदा तालुक्यातील १,२८८ आहेत. त्यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील ६,०४४, अक्राणी ४२०, शहादा १०,०३३, नवापूर ६,१५७ आणि तळोदा तालुक्यातील ४,५४१ व्यक्तिंना योजनेचा लाभ होणार आहे. ८,४६६ शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याने वाढ झालेल्या व्यक्तिंची एकूण संख्या १८ हजार ७२६ आहे. पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना त्या उपलब्ध करून अन्नधान्याचा लाभ देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना या दोन्ही योजनेचा लाभ व्हावा यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. जिल्हा पुरवठा कार्यालय आणि तालुकास्तरीय यंत्रणांनी मोहिम चांगल्यारितीने राबविल्याने भादल, भाबरी, उडद्या सारख्या दुर्गम गावातील नागरिकांनादेखील गावातच शिधापत्रिका प्राप्त झाल्या. शिधापत्रिका तयार करण्याचा खर्च न्यूक्लीअस बजेट अंतर्गत करण्यात येत आहे.
नव्याने शिधापत्रिका तयार झाल्याने आणि ‘वन नेशन वन रेशन’ योजनाही राज्यात सुरू झाल्याने स्थलांतर करणाºया नागरिकांना यापुढे नियमितपणे अन्नधान्याचा लाभ इतरही राज्यात घेता येईल. विशेषत: योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या दुर्गम भागातील नागरिकांना या मोहिमेमुळे प्रथमच या दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार आहे. ही मोहिम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागामार्फत दोन्ही योजनेद्वारे सुमारे ९८ टक्के अन्नधान्य वितरण करून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गतदेखील आतापर्यंत ६,२९२.५ मे.टन तांदळाचे मोफत वितरण करण्यात आले आहे.
संकटाच्या काळात नागरिकांना शिधापत्रिका प्राप्त झाल्याने अंत्योदय कुटुंबाला ३५ किलो अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रती सदस्य पाच किलो वितरण करण्यात येणार आहे. दोन्ही योजनेअंतर्गत तांदूळ तीन रुपये प्रति किलो व गहू दोन रुपये प्रति किलो याप्रमाणे नियमित अन्नधान्याचे वितरण करण्यात येईल. नियमित अन्नधान्य घेतल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रति सदस्य पाच किलो याप्रमाणे एकूण सदस्य संख्येनुसार मोफत तांदळाचे वाटपही करण्यात येणार आहे.