यात्रा सुरू होण्यापूर्वीच सारंगखेड्यात १२०० घोडे विक्रीसाठी दाखल
By मनोज शेलार | Published: December 21, 2023 05:48 PM2023-12-21T17:48:13+5:302023-12-21T17:48:47+5:30
सारंगखेडा येथील दत्त प्रभूंच्या यात्रेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच येथील घोडे बाजाराला सुरुवात झाली आहे.
नंदुरबार : सारंगखेडा, ता. शहादा येथील यात्रेतील प्रसिद्ध घोडे बाजारात देशभरातून घोड्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. सद्य:स्थितीत १२०० घोडे येथे विक्रीसाठी आले आहेत. यात्रा सुरू होईपर्यंत तब्बल तीन हजार घोडे दाखल होण्याची शक्यता आहे.
सारंगखेडा येथील दत्त प्रभूंच्या यात्रेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच येथील घोडे बाजाराला सुरुवात झाली आहे.
येथील घोडे बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे देशभरातील विविध प्रांतातून उमदे घोडे येथे विक्रीसाठी येत असतात. अश्वशौकिनांचीही येथे मांदीयाळी असते. मारवाड, काठेवाडी, पंजाब जातीचे उमदे घोडे विक्रीसाठी येत असतात. चित्रपट सृष्टीतील कलाकारांसह राज्य व केंद्रीय नेतेही अश्व बाजारात भेट देऊन घोडे खरेदी करतात.
गुरुवार अखेर येथील अश्व बाजारात जवळपास १२०० उमदे घोडे दाखल झाले आहेत. यात्रा सुरू होईपर्यंत ही आकडेवारी जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक जाईल अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली. यात्रा काळात सारंगखेडा येथे तात्पुरते कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय उभारले आहे.