सोमवारी दिवसभरात १२३ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 01:17 PM2020-12-29T13:17:16+5:302020-12-29T13:17:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीला शासकीय सुट्यांमुळे ब्रेक लागून अर्ज दाखल करणे थांबले होते. सोमवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीला शासकीय सुट्यांमुळे ब्रेक लागून अर्ज दाखल करणे थांबले होते. सोमवारी शासकीय कार्यालये पुन्हा सुरु झाल्यानंतर दिवसभरात १२३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात सर्वाधिक अर्ज हे नवापूर तालुक्यातून दाखल झाले.
अक्कलकुवा तालुक्यात एक, धडगाव १६, तळोदा ७, शहादा २७, नंदुरबार २२ तर नवापूर तालुक्यात १४ ग्रामपंचायतींत निवडणूक कार्यक्रम घोषित आहे. २३ पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान पहिल्या दोन दिवसात केवळ १३ अर्ज दाखल झाले होते. नाताळ तसेच शनिवार आणि रविवार असे तीन दिवस सुटीचे आल्याने सोमवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. यात धडगाव तालुक्यातून १७, तळोदा २०, शहादा ०५, नंदुरबार १९ तर नवापूर तालुक्यातून ६२ अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी अक्कलकुवा वगळता सर्वच पाच तालुका तहसीलदार कार्यालयांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले होते. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर अर्जाची पोचपावती देण्यासाठी इच्छुक उमेदवार कक्षांमध्ये पोहोचत होते.
८७ ग्रामपंचायतींच्या एकूण ७६५ सदस्यपदांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण २८३ प्रभागातून उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी ७३ हजार ७०२ पुरुष, ७२ हजार ८५२ महिला तर दोन इतर मतदार मतदान करणार आहेत. एकूण एक लाख ४६ हजार ५५५ मतदार या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. दरम्यान अर्ज दाखल करण्याची मदुत ३० रोजी संपणार असल्याने इच्छुक उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी मोठी धावपळ होत असल्याचे दिसून आले.