चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने १३ विद्यार्थ्यांना विषबाधा
By मनोज शेलार | Published: December 19, 2023 07:05 PM2023-12-19T19:05:40+5:302023-12-19T19:05:56+5:30
धडगाव तालुक्यातील धवल पाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या १३ विद्यार्थ्यांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील धवल पाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या १३ विद्यार्थ्यांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी दुपारी विद्यार्थ्यांनी या बिया खाल्ल्यानंतर त्यांना अस्थस्थ वाटू लागले होते. विद्यार्थ्यांना रात्री उशिरा धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली गेली आहे.
धवलपाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी दुपारच्या सुटीत शाळेपासून काही अंतरावर असलेल्या झुडुपांमध्ये उगवलेल्या चंद्रज्योतीच्या बिया गोळा करून खाल्ल्या होत्या. यातून १३ मुला - मुलींची प्रकृती खराब झाली होती. त्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले होते. हा प्रकार शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पालक आणि ग्रामस्थांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. याठिकाणी उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारली होती. आरोग्य विभागातील अधिकारीही रात्री उशिरापर्यंत धडगाव ग्रामीण रुग्णालयात थांबून होते.