नवापुरात 17 लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:54 PM2017-10-14T13:54:30+5:302017-10-14T13:54:30+5:30
दोघांना अटक : गुटख्याची आतार्पयतची सर्वात मोठी कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरानजीक महामार्गावर पोलिसांनी कारवाई करीत 17 लाख 93 हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला आहे. गुरूवारी रात्री उशीरा ट्रकसह एकुण 26 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने पुढील कारवाईसाठी हा साठा त्यांच्या अख्त्यारीत घेतला आहे. दरम्यान, गुटखा जप्तीची आतार्पयतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा नवापूर पोलिसांनी केला आहे.
जिल्ह्यात गुटख्याची अवैध वाहतूक व तस्करी मोठय़ा प्रमाणावर होते. शेजारच्या गुजरात राज्यात गुटख्यावर बंदी नसल्यामुळे या भागातून सर्रास गुटखा येतो. अनेक व्यापारी खुलेआम त्याची वाहतूक करतात. परंतु पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईबाबत एकमेकांवर चालढकल करीत असल्यामुळे अशा तस्कारांचे मोठे फावते आहे.
महामार्गावरून तर मोठय़ा ट्रका आणि वाहनांद्वारे गुटखा सर्रास वाहतूक केला जातो. अशाच प्रकारे गुटख्याची वाहतूक होतांना नवापूर पोलिसांनी कारवाई करीत शुक्रवारी तब्बल 17 लाख 93 हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरून नवापूरकडे अवैध गुटखा एका वाहनातून जाणार असल्याची माहिती नवापूर पोलीस निरिक्षक विजयसिंह राजपूत यांना मिळाली होती. त्यावरून परदेशी यांनी पोलीस कर्मचारी ताथू निकम व कर्मचा:यांना रात्री महामार्गावर पाळत ठेवण्याच्या सुचना दिल्या. कोठडा शिवारातील रेल्वे गेटच्या समांतर रस्त्यावर पोलीस पथकाने एक चारचाकी वाहन (क्रमांक ओडी 23 एफ 0492)अडविले. वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैधरित्या गुटखा भरलेला आढळला. त्याची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. गुटख्याच्या पावतीवर एकुण किंमत 17 लाख 93 हजार 520 रुपयांची नोंद करण्यात आली होती. त्याशिवाय आठ लाखांचे चारचाकी वाहन असा सुमारे 25 लाख 93 हजार 520 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून पोलीस ठाण्यात आणला.
ट्रकचालक राजकुमार रामप्रसाद यादव व नवीन अनिरुद्ध पटेल, रा.ओडिसा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. नवापूर पोलिसांनी त्यानंतर धुळे येथील अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. पथकाने नवापूरात येवून गुटख्याचा साठा ताब्यात घेतला. पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत, उपनिरीक्षक ताथु निकम, हवालदार योगेश थोरात, दिलीप चौरे, आदिनाथ गोसावी, हितेश पाटील यांनी ही कारवाई केली आहे.