मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा,१९५ कोटी मंजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:36 AM2020-07-04T11:36:41+5:302020-07-04T11:36:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामासाठी केंद्र शासनाने त्यांच्या हिस्याचा १९५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामासाठी केंद्र शासनाने त्यांच्या हिस्याचा १९५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. आता राज्य शासनाचा वाट्याचा १३० कोटी रुपयांचा निधी मिळाल्यास इमारत बांधकामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, केंद्राच्या समितीकडून अंतिम मंजुरी मिळताच या वर्षापासून पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. एकदा कॉलेज मंजूर होऊन रद्द झाले होते. नंतर चार वर्षांपूर्वी पुन्हा मंजुरी मिळाली. त्यानंतर कॉलेजच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. केवळ शेवटची मंजुरी मिळताच हे कॉलेज सुरू होणार आहे.
निधीला मंजुरी
मेडिकल कॉलेजच्या मंजुरीसाठी खासदार डॉ.हिना गावीत व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी पाठपुरावा केला होता. त्यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना खासदार डॉ.गावीत यांनी सांगितले, मेडिकल कॉलेजच्या मंजुरीसाठी आपला व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता. एकदाची कॉलेजला मंजुरी मिळाली व पुढील प्रक्रिया सुरू झाली. आता कॉलेजच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधीची आवश्यकता होती. केंद्र शासनाने देशातील ४२ मेडिकल कॉलेजसाठी निधी मंजुर केला असून त्यात महाराष्टÑातील एकमेव नंदुरबारची कॉलेज आहे. एकुण ३२५ कोटी रुपये त्यासाठी लागणार आहेत. त्यातील ६० टक्के हिस्सा हा केंद्रांचा असतो तर ४० टक्के हिस्सा हा राज्य सरकारचा असतो. ६० टक्के हिस्साअंतर्गत १९५ कोटी रुपये केंद्राने मंजुर केले आहे. आता राज्य शासनाला १३० कोटी रुपयांचा हिस्सा द्यावा लागणार आहे. तो देखील लवकरच मिळावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
जागेलाही मंजुरी
मेडिकल कॉलेजसाठी लागणारे हॉस्पीटल हे सिव्हीलचेच हॉस्पीटल राहणार आहे. त्यासाठी सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्यामुळे केवळ आता कॉलेजच्या इमारती आणि होस्टेलच्या इमारतींची गरज आहे. त्यासाठी टोकरतलाव रस्त्यावरील १६.६३ हेक्टर जागा मिळाली आहे. त्याठिकाणी आवश्यक त्या इमारती उभ्या राहणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडील निधी लवकर मिळाला तर बांधकामांना सुरुवात होणार आहे.
या वर्षी प्रवेश प्रक्रिया
पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी यंदा प्रवेश प्रक्रिया राबविली जावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्राच्या समितीने काढलेल्या सर्व त्रुटी पुर्ण करण्यात आल्या आहेत. आता शेवटची मंजुरी मिळताच सर्व मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय डॉक्टर, प्राध्यापक, सहप्राध्यापक यांच्या भरतीसाठी व इतर बाबींसाठी राज्याच्या हायपॉवर कमिटीची बैठक होणे आवश्यक असून. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार डॉ.हिना गावीत यांनी यावेळी दिली.
देशभरातील आदिवासी भागातील एकुण ४२ मेडिकल कॉलेजसाठी केंद्र सरकारने निधी मंजुर केला आहे. त्यातील महाराष्टÑातील केवळ नंदुरबारच्या मेडिकल कॉलेजचा समावेश आहे.
जर भरती प्रक्रिया राबविली गेली नाही तर इतर भागातून प्रतिनियुक्तीवर डॉक्टर व प्राध्यापक आणि सहप्राध्यापक आणण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालयात देखील आवश्यक बदल करण्यात येणार आहेत.