नंदुरबारात 20 हजार गणेशमूर्ती घेताय आकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:41 AM2018-08-23T10:41:05+5:302018-08-23T10:41:19+5:30
नंदुरबार : 20 दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाकरीता मूर्ती घडविण्याचे काम कारागिरांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. यंदा जवळपास 20 हजार लहान, मोठय़ा मूर्ती आकारास येत आहेत. गेल्या वर्षाइतकीच ही संख्या कायम राहण्याची शक्यता आहे. मूर्ती घडविण्यासाठी शेकडो हात रात्रेंदिवस राबत आहेत.
येत्या 13 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे येथील मूर्ती कारखान्यांमध्ये कामाला वेग देण्यात आला आहे. मूर्ती तयार करण्यासाठी शेकडो हातांची लगबग सुरू आहे. हजारो लहान, मोठय़ा मूर्ती आकारास येऊ लागल्या आहेत. येथील मूर्तीकारांकडून तयार करण्यात येणारे साचे विशिष्ट पद्धतीचे राहत असल्यामुळे खान्देशातील अनेक मूर्तीकार ते घेवून जात असतात. येत्या महिनाभरात येथील मूर्ती उद्योगातून लाखो रुपयांची उलाढाल होणार आहे.
नंदुरबारचा गणेशोत्सव जसा प्रसिद्ध आहे तसा येथील मूर्ती उद्योग देखील राज्यात प्रसिद्ध आहे. नंदुरबारच्या मूर्ती उद्योगाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. तब्बल 70 ते 75 वर्षाची परंपरा लाभलेल्या येथील उद्योगाला आता ग्लोबल टच मिळू लागला आहे. चार वर्षापूर्वी जवळपास 400 पेक्षा अधीक लहान मूर्ती थेट दक्षीण अफ्रिकेत पाठविण्यात आल्या होत्या.
हजारो मूर्त्ीचे काम पूर्ण
नंदुरबारात मूर्ती बनविणारे लहान मोठे 30 ते 35 कारखाने आहेत. शिवाय काही घरगुती मूर्ती बनविणारे कारागिर देखील आहेत. जून महिन्यापासून या कारखान्यांमध्ये कामाला सुरूवात होते. शेकडो हात तीन ते चार महिने राबत असतात. पूर्वी नंदुरबारात मोजकेच कारागिर होते. त्यांच्या हाताच्या कलेने येथील मूर्ती व्यवसाय नावारूपाला आला. हळूहळू अनेकजण त्यात उतरले. काहीजण मोठय़ा मूर्तीकारागिराकडे शिकून स्वत:चा कारखाना सुरू केला तर काही व्यवसाय म्हणून यात उतरले आहेत. शहरातील गल्लोगल्ली असलेले कारखाने आणि घरगुती उद्योगातून तयार होणा:या मूर्त्ीची संख्या 20 हजारांपेक्षा अधीक जाते. त्यातून तीन महिन्यात करोडोंची उलाढाल होत असते.
मूर्ती कलेला पसंती
नंदुरबारच्या मूर्तीला राज्याप्रमाणे गुजरात व मध्यप्रदेशातून देखील मोठी मागणी आहे. या दोन्ही राज्यातील मंडळे दोन ते तीन महिने आधीच मूर्ती बुकींग करतात. शिवाय त्यांना जशी मूर्ती लागेल तशी ते बनवून देखील घेतात. राज्यापेक्षा या गुजरात व मध्यप्रदेशात विक्री होणा:या मूर्त्ीचे प्रमाण अधीक आहे.
परप्रांतिय होणार दाखल
येथील मूर्ती उद्योगाला आता परप्रांतिय कारागिरांच्या अतिक्रमणालाही तोंड द्यावे लागत आहे. बाहेरून येणारे कारागिर साच्यात बनविलेल्या मूर्ती येथे विक्रीस आणतात.
कमी किंमतीत असलेल्या या मूर्त्ीमुळे स्थानिक मूर्ती व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे परप्रांतिय मूर्तीकारांना शहराबाहेर मूर्ती विक्रीसाठी सक्ती करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत असली तरी त्याकडे शासन, प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे.
येत्या काळात नंदुरबारातील गणेशमूर्तीची बाजारपेठ चांगलीच गजबजणार आहे. त्यादृष्टीने व्यावसायिकांनी तयारीही करून ठेवली आहे.