नंदुरबार जिल्ह्यातील चोरीस गेलेल्या 23 दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:55 AM2017-10-28T11:55:05+5:302017-10-28T11:55:05+5:30
पाच जणांवर गुन्हा : पोलिसांच्या विविध पथकांनी केली जिल्हाभरात कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये झालेले वाढ लक्षात घेता पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत होती. ही बाब लक्षात घेता पोलिसांच्या पथकांनी गेल्या 15 दिवसात चोरीच्या एकुण 23 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्ह्याचे भौगोलीक स्थान गुजरात व मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सिमेवर असल्याने आंतरराज्य गुन्हेगार हे एका राज्यात चोरी करून दुस:या राज्यात वाहने विकतात. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने तपासाला गती दिली. मागील 15 दिवसांपासून आपल्या पथकासह अथक परिश्रम घेवून धडगाव, मोलगी, अक्कलकुवा, तळोदा या तालुक्यातील डोंगराळ भागातून व शेजारील राज्यातून संशयीत इसमांची माहिती मिळविली. पथकाने मिळविलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मिनेश चंपक तडवी, रा.गदवानी, ता.अक्कलकुवा यास ताब्यात घेवून त्यांचेकडून एक लाख 50 हजार रुपये किंमतीच्या हिरो होंडा कंपनीच्या तीन व बजाज कंपनीची एक, सुरेश कालुसिंग पावरा, रा.वाडी, ता.शिरपूर यांचेकडून तीन लाख 50 हजार किंमतीच्या हिरोहोंडा कंपनीच्या आठ व बजाज कंपनीची एक, मुश्ताक नुर मोहमंद मक्रानी रा.छोटी राजमोही, ता.अक्कलकुवा यांचेकडून चार लाख 20 हजार किंमतीच्या हिरोहोंडा कंपनीच्या आठ, होंडा कंपनीच्या दोन अशा एकूण नऊ लाख 20 हजार रुपये किंमतीच्या एकूण 23 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपींनी या मोटारसायकली नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, विसरवाडी, धुळे, शिरपूर, अंमळनेर, चोपडा, शिंदखेडा या भागातून तसेच गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील सिमावर्ती भागातून चोरल्याचे सांगितले आहे.
हे आरोपी आंतरराज्य गुह्यांमध्ये सक्रीय असून, त्यांच्याकडून पुढील तपासात अजून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे.शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, अनिल गोसावी, रवींद्र लोंढे, हवालदार पंढरीनाथ ढवळे, रवींद्र पाडवी, विकास पाटील, योगेश सोनवणे, विनोद जाधव, दीपक गोरे, जगदीश पवार, प्रमोद सोनवणे, जितेंद्र अहिरराव, विकास अजगे, भटू धनगर, गोपाल चौधरी, संदीप लांडगे, मोहन ढमढेरे, तुषार पाटील, किरण पावरा, राहुल भामरे, महेंद्र सोनवणे, किरण मोरे, अमोल पवार, रामचंद्र ठाकरे यांच्या पथकाने केली आहे.
या वेळी जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची माहिती दिलेली असून, ज्या नागरिकांच्या मोटारसायकलींची चोरी झाली असेल त्यांनी माहितीची पडताळणी करून आपली मोटारसायकल असल्यास स्थानिक गुन्हे अन्वे.शाखा नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.