२४५ बाधितांनी निवडला होमआयसोलेशनचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:41 PM2020-09-30T12:41:22+5:302020-09-30T12:41:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याची टक्केवारीही दिलासादायक आहे़ यातून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याची टक्केवारीही दिलासादायक आहे़ यातून होम आयसोलेटेड राहून उपचार घेणाऱ्यांची संख्याही वाढली असून आजअखेरीस २४५ जण घरी राहून उपचार घेत आहेत़
जिल्ह्यात रुग्ण बरा होण्याचा दर ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे़ यामुळे रुग्ण होम आयसोलेशचा पर्याय अवलंबत आहेत़ २१ आॅगस्टपर्यंत १८३ रुग्ण होम आयसोलेटेड असल्याची नोंद होती़ यात नंदुरबार ६५, शहादा ४०, तळोदा ३२, नवापूर तालुक्यातील ४५ जणांचा समावेश होता़ या रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण हे १ ते ५ दिवस तसेच ५ ते १५ दिवस या दरम्यान होते़ दहाव्या दिवशी त्यांचे स्वॅब टेस्ट करुन निर्वाळा देण्यात आला होता़ यातील एकही रुग्ण दगावलेला नाही़ सर्वांना किरकोळ लक्षणे असल्याने त्यांनी घरीच राहून उपचाराचा निर्णय घेतला होता़ हा निर्णय यशस्वी झाल्याने इतर रुग्ण होम आयसोलेशनकडे वळू लागले आहेत़
‘लोकमत’ने होम आयसोलेशन उपक्रमाचा मंगळवारी आढावा घेतला़ रुग्णांची आणि एरियाची नावे देण्याबाबत प्रशासनाने बंधने लावली आहेत़ शहरातील कोकणी हिल, तळोदा रोड परिसरातील पाच ठिकाणी होम आयसोलेटेड रुग्ण आहेत़ त्यांना जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांची औषधी देण्यात आली आहे़ ही औषधी संपल्यानंतर त्यांचे आॅक्सिजन लेव्हल तपासून नव्याने औषधी देणे किंवा तपासणी याबाबत निर्णय घेतला जाणार आहे़
ग्रामीण भागात होम आयसोलेटेड रुग्ण नियम मोडत असल्याच्या तक्रारी होत्या़ आरोग्य विभागाने त्यांची भेट घेत समज दिली होती़ बाधित असताना बाहेर फिरल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याची तरतूद असल्याने रुग्ण घरीच आहेत़ सर्वच जणांकडून लेखी लिहून घेत त्यांना घरी उपचार घेण्याची मुभा दिली गेली आहे़
जिल्ह्यात २८ सप्टेंबरपर्यंत २४५ जण होम आयसोलेट असल्याची माहिती आहे़ यात नंदुरबार शहर आणि तालुक्यात सर्वाधिक १५०, शहादा ८० आणि तळोदा येथे १५ रुग्ण समाविष्ट आहेत़
४या रुग्णांना त्यांच्या इच्छेनुसार खाजगी किंवा शासकीय रुग्णालयातून उपचार घेण्याची मुभा आहे़ बहुतांश जणांनी जिल्हा रुग्णालयातून औषधी घेतली असल्याची माहिती आहे़ खाजगी पॅकेज घेणाऱ्यांची संख्या १० पेक्षा अधिक नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़ १० दिवसानंतर रुग्णांचे स्वॅब व आॅक्सिजन चेक करुन कोरोनामुक्त झाले किंवा कसे याची माहिती दिली जात आहे़
प्रशासनाने बाधितांच्या घरची परिस्थिती पाहून त्यांना होम आयसोलेशनची परवानगी दिली आहे़ यातून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ३५० रुग्ण बरे झाले आहेत़ होम आयोसोलेटेड रुग्ण बरे होण्याचा दर हा चांगला आहे़ यातून प्रशासन या रुग्णांवर लक्ष ठेवत आहे़
-डॉ़ एऩडी़बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबाऱ