नंदुरबार जिल्ह्यात २५ लाख टन उसाचे गाळप; आठवड्याभरात हंगामाची सांगता होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 06:39 PM2023-03-29T18:39:17+5:302023-03-29T18:39:26+5:30
जिल्ह्यातील तीन साखर कारखाने व गुजरात, मध्यप्रदेशातील सिमावर्ती असलेल्या खांडसरी उद्योगांनी यंदाच्या हंगामात २५ लाख टन उसाचे गाळप केले आहे.
रमाकांत पाटील
नंदुरबार : जिल्ह्यातील तीन साखर कारखाने व गुजरात, मध्यप्रदेशातील सिमावर्ती असलेल्या खांडसरी उद्योगांनी यंदाच्या हंगामात २५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. दरम्यान, हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून, येत्या आठवड्याभरात हंगामाची सांगता होणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा, आदिवासी आणि आयान या तीन साखर कारखान्यांनी एकूण १४ लाख ६४ हजार ७९० टन उसाचे गाळप केले आहे. त्यात सर्वाधीक आयान शुगरने १० लाख ६१ हजार २७२ टन उसाचे गाळप केले आहे. या शिवाय सीमावर्ती भागात असलेल्या दुर्गा, केदारेश्वर, गोवर्धन व श्रीकृष्ण खांडसरी उद्योगांनी जवळपास ११ लाख टन उस गाळप केला आहे.
सर्वाधिक दुर्गा खांडसरी उद्योगाने साडेचार लाख टन उसाचे गाळप केले आहे. हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, एक साखर कारखाना व दोन खांडसरी उद्योग सध्या सुरू आहेत. त्यांचा हंगामही आठवड्याभरात संपणार असल्याचे चित्र आहे.