जिल्ह्यात नव्याने २६१ अंगणाडींना इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:43 PM2020-10-08T12:43:32+5:302020-10-08T12:43:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आदिवासी विकास योजना आणि आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत २६१ अंगवाडी इमारत बांधकामास गेल्या वर्षभरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात आदिवासी विकास योजना आणि आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत २६१ अंगवाडी इमारत बांधकामास गेल्या वर्षभरात मंजूरी देण्यात आली आहे. नवीन अंगणवाडी बांधकाम आणि २०१६ पासून अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.
पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांच्या निदेर्शानुसार आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमाती उपयोजना (टीएसपी) अंतर्गत २०० अंगणवाड्यांसाठी ११ कोटी ८१ लाख ८० हजार वितरीत करण्यात आली आहे. तर आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत ६१ अंगणवाड्यांना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दोन कोटी ९० लाख ८० हजाराचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. टीएसपी अंतर्गत मंजूरी देण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये अक्कलकुवा ९५, धडगाव ४६, तळोदा १२, शहादा १९, नंदुरबार आठ आणि नवापूरमधील २० अशा २०० अंगणवाड्यांचा समावेश आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत मंजूरी देण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये अक्कलकुवा एक, मोलगी चार, धडगाव १६, खुंटामोडी तीन, तळोदा पाच, शहादा १३, म्हसावद सहा, नंदुरबार सहा, रनाळा सहा नवापूरमधील एक अशा ६१ अंगणवाड्यांचा समावेश आहे.
अंगणवाडीमध्ये पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी संदर्भ आरोग्य सेवा, अनौपचारीक शिक्षण, आरोग्यविषयक शिक्षण आदी सेवा पुरविल्या जातात. अंगणवाडी नसल्याने ग्रामीण भागात या सेवा पूर्ण क्षमतेने देण्यात अडचणी निर्माण होतात. अमृत आहार व घरपोच आहार वाटपासाठीदेखील अंगणवाडी महत्वाची आहे. अंगणवाडी बांधकामामुळे या समस्या दूर होणार आहेत.
दुर्गम भागातील अनेक अंगणवाडी इमारती या कुडाच्या घरात किंवा भाड्याच्या घरात भरत असतात. त्यामुळे आता त्यांना हक्काच्या इमारती मिळणार आहेत.